घरमहाराष्ट्रनाशिकपाण्याचा एकही स्त्रोत नसलेल्या गावात आज २४ तास पाणी

पाण्याचा एकही स्त्रोत नसलेल्या गावात आज २४ तास पाणी

Subscribe

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिल्यांदाच पाणी; गावकर्‍यांचे श्रमदान अन् सोशल नेटवर्किंग फोरमचे सहकार्य

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून पाण्यासाठी भटकंती करत असलेल्या अन् पाण्याचा एकही स्त्रोत नसलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पांगुळघर गावात सोशल नेटवर्किंग फोरमच्या सहकार्याने आणि ग्रामस्थांच्या श्रमदानातून अखेर चैतन्याचा पाझर फुटला. गावकर्‍यांचे श्रम आणि सोशल नेटवर्किंगचे जलाभियान यांनी संयुक्तपणे केलेल्या पाईपलाईनमुळे आज सर्वाधिक दुष्काळी गावापैकी एक असलेल्या या गावात २४ तास पाणी उपलब्ध आहे.

महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेला विभागणारी दमणगंगा नदी पांगुळघरापासून नजिकच. गावापासून २२०० फूट अंतरावर विहिरीचे पाणी पोहोचते. परंतु, गाव डोंगर माथ्यावर असल्यामुळे पाणी येथे कसे पोहोचणार? हा गावकर्‍यांपुढे सर्वात मोठा प्रश्न होता. अनेक वर्षांपासून पाण्याची ही समस्या मिटवण्याचा निर्धार पक्का झाल्यामुळे त्यावर तोडगा काढण्याचे ठरले. २०१७ मध्ये प्रमोद गायकवाड यांच्या सोशल नेटवर्किंग फोरमविषयी येथील नागरिकांना माहिती मिळाली. २२०० फूटावरुन पाणी आणण्यासाठी अगोदर तेथे विहीर खोदण्याचे ठरले. विशेष म्हणजे गावकर्‍यांनी स्वत: कुदाळ, फावडे हातात घेऊन चार महिने अहोरात्र श्रमदान केले. विहिर खोदल्यानंतर तिला चांगले पाणीही लागले. याचा आनंद तर अपार, पण हे पाणी गावात पोहोचवण्याची खरी कसोटी होती.

- Advertisement -

सोशल नेटवर्किंग फोरमने त्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना निधी संकलनाचे आवाहन केले. अनेकांनी मदतीचा हातभार लावल्याने तब्बल साडेचार लाखांची मदत उभी राहिली. पाईपलाईन, मोटर आणि विहिरीच्या बांधकामासाठी हा खर्च झाला पण पाण्याच्या टाकीचा प्रश्न अपूर्ण राहिला. ग्रामपंचायतीने स्व:खर्चातून ही टाकी उभारल्याने ऑक्टोबर २०१८ मध्ये गावात स्वातंत्र्यानंतर प्रथमच नळाला पाणी आले. गावकर्‍यांनी या पाण्याचा दिवाळीप्रमाणे आंनदोत्सव साजरा करत सर्वांना जेवणाचे निमंत्रण दिले. सोशल नेटवर्किंगने दुष्काळावर मात करत माळरानावर पाणी पोहोचवल्याने येथील नागरिक आजही समाधान व्यक्त करतात. मुबलक पाणी असले तरी त्याचा काटकसरीने वापर करण्यास त्यांचा आग्रह आहे. विशेष म्हणजे गावात पाणीपुरवठा योजना असली तरी उन्हाळ्यात सार्वजनिक विहीरीवरुन पाणी भरण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे पाण्याची बचत होते आणि पूर्वाश्रमीच्या कष्टांची जाणीव राहते, या त्यामागील उद्देश असल्याचे येथील गावकरी आवर्जुन सांगतात.

सहा गावांमध्ये काम सुरू

गावकर्‍यांची मानसिकता असेल तर दुष्काळावर प्रभावीपणे मात करता येऊ शकते. पांगुळघर येथील नागरिकांनी एकजुटीने श्रमदान केले. सोशल नेटवर्किंगला मिळालेल्या प्रतिसादामुळे आज गावात २४ तास पाणी उपलब्ध आहे. त्याप्रमाणे पेठ, त्र्यंबक व सुरगाणा तालुक्यातील सहा गावांमध्ये काम सुरु आहे. – प्रमोद गायकवाड, अध्यक्ष, सोशल नेटवर्किंग फोरम

- Advertisement -

मोठी समस्या दूर होईल

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिल्यांदाच गावात पाणी आल्यानंतर सर्वांनीच दिवाळी साजरी केली. एकत्रितपणे काम केल्यास त्याचे फळही चांगले मिळते. अन्य टंचाईग्रस्त गावांनीदेखील अशाप्रकारे श्रमदान करून दुष्काळावर मात केल्यास मोठी समस्या दूर होईल. – भगवान भोये, नागरिक, पांगुळघर, ता. त्र्यंबक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -