घरफिचर्सरिव्हेंज बदल्याचा हिंसोत्सव

रिव्हेंज बदल्याचा हिंसोत्सव

Subscribe

एक जोडपं आणि इतर दोन पुरुष अशी पात्रं असताना ‘रिव्हेंज’ असं नाव दिलेल्या चित्रपटात जे घडायचं ते घडतं. रात्री पार्टी करून झाल्यावर रिचर्ड बाहेर असताना स्टॅन भरपूर मादक दिसणार्‍या जेनशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करू लागतो, आणि सगळं बिनसतं. रिचर्डला ही गोष्ट कळाल्यावर तोही फार काही न करता, जेनला काही पैसे देऊन शांत करण्याचा प्रयत्न करतो, आणि एव्हाना प्रेक्षकाला अपेक्षित असलेल्या प्रकरणाला सुरुवात होते.

‘रिव्हेंज’चा विषय आणि त्याचं मूलभूत कथानक अगदी त्याच्या नावाइतकंच साधं सरळ आहे. ज्यामुळे सदर चित्रपट आपल्या विषयाबाबत फार तडजोड न करता, अगदी स्पष्टपणे समोर सादर होतो. फक्त फरक इतकाच की यापूर्वी अनेक चित्रपटांमध्ये मांडल्या गेलेल्या मूलभूत कथेला तो वैशिष्ठ्यपूर्ण, आणि सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीने आकर्षक वाटेल अशा पद्धतीने समोर घेऊन येतो. त्यामुळे जी गोष्ट एरवी तिच्या वारंवार झालेल्या वापरामुळे अगदीच रटाळ वाटू शकली असती तीच गोष्ट इथे मोहक बनते, आणि ‘रिव्हेंज’ काही उत्तम अ‍ॅक्शन-थ्रिलर्सपैकी एक बनतो.

- Advertisement -

रिचर्ड (केव्हिन जेंसीन्स) या बड्या उद्योगपतीशी जेनचे (मथिल्डा लट्झ) विवाहबाह्य संबंध आहेत. रिचर्ड दरवर्षी काही एक दिवसांच्या हंटिंग ट्रिपवर रवाना होत असतो. अशा वेळी वाळवंटी प्रदेशाने वेढलेल्या त्याच्या निर्जन घरात त्याचं वास्तव्य असतं. यावर्षी मात्र तो आणि जेन ट्रिपवर जाण्याच्या दोनेक दिवस आधीच तिथे जाऊन राहण्याचा आणि जरा मौजमजा करण्याचा बेत आखतात, त्यानंतर लगेचच जेनचं पुन्हा परतणं अपेक्षित असतं. तो ज्या मित्रांसोबत हा वार्षिक कार्यक्रम आखत असतो ते मित्र, स्टॅन (व्हिन्सेंट कलोम्ब) आणि दिमित्री (गियुम बॉचीद), मात्र अपेक्षेपेक्षा एक दिवस आधीच त्याच्याकडे पोचतात.

एक जोडपं आणि इतर दोन पुरुष अशी पात्रं असताना ‘रिव्हेंज’ असं नाव दिलेल्या चित्रपटात जे घडायचं ते घडतं. रात्री पार्टी करून झाल्यावर रिचर्ड बाहेर असताना स्टॅन भरपूर मादक दिसणार्‍या जेनशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करू लागतो, आणि सगळं बिनसतं. रिचर्डला ही गोष्ट कळाल्यावर तोही फार काही न करता, जेनला काही पैसे देऊन शांत करण्याचा प्रयत्न करतो, आणि एव्हाना प्रेक्षकाला अपेक्षित असलेल्या प्रकरणाला सुरुवात होते. सगळ्या गोष्टी उलटसुलट होत राहतात, चित्रपट जसा पुढे सरकत जातो तशा भक्ष्य आणि भक्षक या संज्ञांचे हकदारदेखील बदलत जातात. गोड गुलाबी रूपातील ‘बार्बी डॉल’चं रूपांतर हिंसोत्सवाच्या मूर्तीत होतं, आणि बदल्याच्या या कथेतील मूळ प्रकरणाला सुरुवात होते.

- Advertisement -

एकूणच असा सगळा काहीसा क्लिशेड मामला असताना एरवी निर्जन आणि भयाण दिसणार्‍या वाळवंटाकडेही अगदीच आकर्षक वाटेल अशा दृष्टीने पाहणारं रोब्रेक्ट हेव्हर्टचं छायाचित्रण, आणि रॉबिन कडर्टचं संगीत या दोन गोष्टी चित्रपटाला एरवीसारख्या नीरस भासणार्‍या रेप-रिव्हेंज अ‍ॅक्शनपटासारखं होऊ देत नाहीत. चित्रपटाचं साऊंड डिझाइन त्याच्या महत्त्वाच्या घटकांपैकी एक आहे, ज्यामुळे या माध्यमाच्या दृकश्राव्य असण्याला नवे आयाम प्राप्त होतात. कॉर्ली फारगीटचं दिग्दर्शनही अगदीच नेटकं आणि थेट आहे.

एक गोष्ट स्पष्ट आहे की, ‘रिव्हेंज’ क्वेन्टिन टॅरंटिनोच्या ‘किल बिल’चं (2003/04), त्यातील स्त्रीवादाचं, आशियाई संस्कृती आणि तिच्यात दडलेल्या वैचारिकतेचं नवीन रूप नाहीये, अगदी त्यांच्यातील साम्यस्थळांची यादी बनवता आली तरीही. कुणाला जर हे सगळं पाहायचंच असेल तर ‘किल बिल’ पहावा, अशावेळी ‘रिव्हेंज’ पाहण्यात अर्थ नाही. कारण तो वैचारिकता, नैतिक-अनैतिकता अशा भानगडीत न पडता मुख्यतः पल्प सिनेमाच्या चाहत्यांसाठी निर्माण केलेला अ‍ॅक्शन-थ्रिलर-हॉरर चित्रपट आहे. त्यामुळे त्याकडून प्रबळ असा वैचारिक, मानसशास्त्रीय संदेश मिळावा अशी अपेक्षा नाहीच.

इथे काहीसा स्त्रीवादी घटकही अस्तित्त्वात आहेच, पण इतकंच. एरवी मात्र निर्जन ठिकाणी धावणारं कुणीतरी, आणि त्याला मारण्यासाठी त्याच्याही पाठीमागे धावणारं आणखी कुणीतरी असा प्रकार आहे. सोबतीला ड्रग्ज आणि सेमी-न्यूडिटी, मोठमोठ्या बंदुका, चेस सीक्वेन्सेसही आहेत. हा सारा सत्तर-ऐंशीच्या दशकातील ‘नेकेड वेंजिअन्स’ (1985) किंवा तत्सम बी-ग्रेड चित्रपटांच्या कथानकाला समांतर प्रकार असला तरी हा चित्रपट वेगळा ठरतो तो मुख्यत्वे त्याच्या नो-नॉन्सेन्स दृष्टिकोनामुळे. मनुष्यवस्ती नसलेल्या, मैलोनमैल नुसती राकट दगड आणि तप्त जमीन असलेल्या भागात माथ्यावर सूर्य चमकत असताना हे सगळं ज्या प्रकारे उलगडत जातं ते दृश्यपातळीवर थक्क करणारं ठरतं.

हिंसा हा रेप-रिव्हेंज नाट्यातील महत्त्वाचा घटक इथेही अस्तित्त्वात आहे. बंदुकीच्या गोळीने झालेल्या जखमा आणि रक्तस्रावापासून ते इतर अतर्क्य प्रकारांपर्यंत सर्व काही इथे पहायला मिळतं. पण ते कशाप्रकारे चित्रित केलं जातं, ते त्याहून महत्त्वाचं मानता येईल. म्हणजे इथेही हिंसा दृश्यात्मक पातळीवर ‘मँडी’प्रमाणे (2018) सुंदररीत्या चित्रित केलेली असली तरी ती त्याचवेळी क्रूर, आणि अंगावर येईल अशीही ठरेल हेही पाहिलं जातं. ज्यामुळे तिचा परिणाम कुठेही कमी होत नाही. परिणामी ‘रिव्हेंज’ हा उत्तमरीत्या हाताळलेला बी-ग्रेड चित्रपट, आणि हिंसक पल्पी सिनेमांचं अप्रतिम मिश्रण ठरत रंजक आणि पहावा असा बनतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -