घरमुंबईमनपा सफाई कामगारांचा पगार ५०० रुपये; काम बंद आंदोलनाचा इशारा

मनपा सफाई कामगारांचा पगार ५०० रुपये; काम बंद आंदोलनाचा इशारा

Subscribe

पालिकेतील अनेक सफाई कामगारांना याचा फटका बसत आहे. मे महिन्याचा पगार शनिवारी बँकेत जमा झाला.

मुंबई महापालिकेच्या कामचुकार कामगारांना शिस्त लावण्यासाठी बायोमेट्रीक हजेरी नोंदण्यास सुरुवात झाली असली तरी या बायोमेट्रीक हजेरीनेच आता कामगारांचा पगार खावून टाकला आहे. सेवा बजावूनही बायोमेट्रीक हजेरी न नोंदवली गेल्यामुळे अनेक कामगारांचे पगार कापले गेले असून ग्रॅडरोड येथील महापालिकेच्या डी विभागातील बहुतांशी सफाई कामगारांच्या खात्यात मे महिन्याचा केवळ ५०० रुपये पगार जमा झाला आहे. त्यामुळे सफाई कामगारांमध्ये तीव्र संताप पसरलेला असून शनिवारी या विभागातील सर्व कामगारांनी आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र, याचा निषेध म्हणून येत्या सोमवारपासून कामबंद आंदोलनाचा इशारा कामगार संघटनेने दिला आहे.

पगाराचा मॅसेज पाहून बसला धक्का

बायोमेट्रीक हजेरीबाबत मागील काही महिन्यांपासून कामगार आणि कर्मचार्‍यांच्या तक्रारी वाढत असून सेवा बजावूनही त्या दिवसांची हजेरी नोदवली न गेल्यामुळे कामगारांचे पगार कापले गेले आहेत. पालिकेतील अनेक सफाई कामगारांना याचा फटका बसत आहे. मे महिन्याचा पगार शनिवारी बँकेत जमा झाला. परंतु त्याचा मेसेज कामगारांना मोबाईलवर येताच त्यांना धक्काच बसला. अनेकांच्या बँक खात्यात ७ रूपयांपासून ५०० रुपये पगार जमा झाले होते. सर्व विभाग कार्यालयातील सफाई कामगारांचा पगाराची काट-छाट करण्यात आल्यामुळे शनिवारी सकाळी म्युनिसिपल मजदूर युनियनचे प्रविण मांजलकर यांच्या नेतृत्वाखाली सफाई कामगारांनी विभाग कार्यालयाबाहेरच ठिय्या दिला. या आंदोलनाला युनियनचे कार्याध्यक्ष अशोक जाधव यांनी भेट देऊन, शिष्टमंडळासह सहाय्यक आयुक्तांची भेट घेतली. पण त्यानंतर आयुक्तांनी भेट देण्यास नकार दिल्यामुळे दुपारनंतर काम बंद आंदोलन पुकारण्यात आले.

- Advertisement -

सोमवारी कामबंद आंदोलनाचा इशारा

अखेर सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांची भेट देऊन, हा धोरणात्मक निर्णय असल्याचे सांगितले. परंतु यामुळे कामगारांचे समाधान झाले नाही. त्यामुळे कामगारांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. येत्या सोमवारपर्यंत यावर तोडगा काढून बँकेत केलेल्या कामाचा पगार जमा केला नाही तर, पालिकेचे सर्व सफाई कामागार संपावर जातील, असा इशारा प्रविण मांजलकर यांनी दिला आहे. पालिका प्रशासनाने बायोमेट्रीकमध्ये अडचण असल्यास जुन्या पध्दतीने हजेरी घेण्याचे आदेश दिले आहेत. पण हे काम कोणी करायचे यावरून विभाग कार्यालयातील अधिकार्‍यां मतभेद आहेत. याचा फटका सफाई कामगारांना बसत असल्याचा आरोप मांजलकर यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -