घरमहाराष्ट्रमाढाला पाणी दिलं असतं तर निवडणूक जिंकला असतात; उदयनराजेंची शरद पवारांवर टीका

माढाला पाणी दिलं असतं तर निवडणूक जिंकला असतात; उदयनराजेंची शरद पवारांवर टीका

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसवर नेहमीच टीका करणारे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला आहे. नीरा देवघर धरणाच्या डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारे पाणी बंद करण्याचा अध्यादेश निघाल्यानंतर उदयनराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर टीका केली. “निवडणुकीच्या तोंडावर लोक येतात आणि माढातून निवडणूक लढवू म्हणतात. पण माढाच्या लोकांना याआधीच पाणी दिले असते तर तुम्हाला माढाची निवडणुक जिंकता आली असती”, अशी टीका शरद पवार यांचे नाव न घेता उदयनराजे यांनी केली आहे.

शरद पवार यांच्यासोबतच उदयनराजे यांनी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचेही नाव न घेता जोरदार टीका केली. “स्वतःला भगीरथ म्हणवून घेणाऱ्यांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री असताना काहीच काम केले नाही. मंत्रीपदी असताना लाल दिव्याच्या गाडीचा वापर फक्त लोकांना हिणवण्यासाठी केला, त्यांना आता देवसुद्धा क्षमा करणार नाही.” असे उदयनराजे म्हणाले.

- Advertisement -

बारामतीला वाढीव पाणी का दिले

नीरा देवघर या धरणाची निर्मित आघाडी सरकारच्या काळात झाली. धरणाच्या डाव्या कालव्यातून बारामती, इंदापूरसाठी ४३ टक्के तर उजव्या कालव्यातून सातारा, सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यांना ५७ टक्के पाणी देण्याचा करार करण्यात आला होता. तरिही सातारा, सोलापूरला हक्काचे पाणी मिळाले नाही. उलट बारामतीला ६० टक्के पाणी सोडण्यात येत होते. यावर उदयनराजे यांनी आक्षेप घेतला आहे. उजव्या कालव्याचे बांधकाम पुर्ण नसल्याबाबतही त्यांनी शंका उपस्थित केली. या भागाला पाणी येऊ द्यायचे नव्हते, म्हणून कालव्याचे काम पुर्ण केले नाही का? अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे. तसेच १४ वर्ष ज्यांनी पाणी पळवले त्यांनी त्याचवेळी आजच्यासारखा अध्यादेश का काढला नाही? असा सवालही उपस्थित केला.

माढा मतदारसंघात भाजपचा खासदार निवडून आल्यानंतर नीरा देवघर धरणाच्या डाव्या कालव्यातून बारामतील जाणाऱ्या पाण्याचा विषय सुरु झाला. माढाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन फलटणच्या हक्काचे पाणी पुन्हा मिळावे, अशी मागणी लावून धरली. त्यानंतर काल राज्य सरकारने बारामतीला जाणेर नियमबाह्य पाणी बंद करण्याबाबत अध्यादेश काढला. यामुळे आता साताऱ्यातील फलटण तालुका, सोलापूरमधील माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यांना पाणी मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -