घरताज्या घडामोडीकर्नाळा अभयारण्यातील उपाययोजना फोल ; प्राण्यांची सुरक्षा राम भरोसे

कर्नाळा अभयारण्यातील उपाययोजना फोल ; प्राण्यांची सुरक्षा राम भरोसे

Subscribe

वनविभागाच्या निष्काळजीपणामुळे विनाकारण मुक्या प्राण्यांचे जीव जात आहेत.

पनवेल तालुक्यातील कर्नाळा अभयारण्य निसर्ग विविधतेसाठी प्रसिद्ध आहे. कर्नाळा अभयारण्यालगत मुंबई-गोवा हायवेवर प्राणी येणार नाहीत यासाठी दुतर्फा प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र करोडो रुपये खर्च करुनही येथील प्राणी मात्र असुरक्षितच आहेत. वनविभागाच्या निष्काळजीपणामुळे विनाकारण मुक्या प्राण्यांचे जीव जात आहेत. शनिवार दि. २१ ऑगस्टला दुपारी पावणे बाराच्या दरम्यान अभयारण्यातील परिसरात एका वाहनाने माकडाल धडक देऊन माकड गंभीररित्या जखमी झाले होते. त्या दरम्यान पनवेलहून पेणच्या दिशेने येत असलेल्या सामाजिक कार्यकर्ता संतोष ठाकूर यांनी रस्त्याच्या मधोमध पडलेल्या जखमी माकडाला रस्त्याच्या कडेला नेले. त्यानंतर त्यांनी वनअधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही. अखेर ते कर्नाळा अभयारण्याच्या कार्यालयात गेले. परंतु तिथेही वन परिक्षेत्र अधिकारी उपलब्ध नसल्याचे समजले. मात्र तिथे असलेल्या रक्षक राठोड यांना त्या जखमी माकडावर उपचार करण्याची विनंती करण्यात आली. परंतु जखमी माकडाला उचलण्यासाठी साहित्य उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले, यावरुनच अभयारण्यातील प्राण्यांचा जीव असुरक्षित असल्याचे लक्षात येते.

वनविभागाचे दुर्लक्ष 

वनविभागाने मुंबई गोवा महामार्गावर जे प्रवासी प्राण्यांसाठी खाद्यपदार्थ रस्त्यावर टाकतात त्यांच्यावर कारवाई करण्याची सततची मागणी होऊनसुद्धा कर्नाळा अभयारण्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी दुर्लक्ष देत आहेत. खाद्यपदार्थ देणे ही काही चूकीची बाब नसून, नागरिकांनी ती बेजबाबदारीपणे रस्त्यावर टाकू नये. खाद्यपदार्थ देताना जसा प्राणीप्रेमाचा आव आणता तसेच तो रस्त्यावर टाकल्यास मुक्या जनावरांच्या जीवाचा विचार बेशिस्त नागरिकांनी करणे गरजेचे आहे. याशिवाय अभयारण्य मार्गावरुन प्राण्यांची विशेषत: माकडांच्या टोळीची ये-जा असते. त्यामुळे निदान अभयारण्याशेजारी तरी गाडीने प्रवास करणाऱ्यांनी आपल्या वेगाला आळा घालणे गरजेचे आहे.

- Advertisement -

माकडांसाठी ‘झूलता पूल’

कर्नाळा अभयारण्याच्यालगतच्या महामार्गावर माकडांना रस्ता ओलांडण्यासाठी झूलता पूल म्हणजेच मंकी लॅडर बांधण्यात आले आहेत. माकडांनी देखील या लॅडरचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या झाडांच्या साहाय्याने हे मंकी लॅडर बांधण्यात आले आहेत. मात्र तरीही प्रत्येकवेळी माकड या पूलाचा वापर करतातच असे नाही त्यामुळे प्राणीप्रेमी असलेल्या प्रवाशांनी माकडांना खाऊ देताना अथवा कर्नाळालगतच्या महामार्गावरून जाताना आपल्या बेशिस्तपणाला आवर घालणे गरजेचे आहे.

महामार्गाला ध्वनीरोधक यंत्रणेचे कवच असले तरीही….

- Advertisement -

अलिबाग- मुंबई गोवा महामार्गावर अभयारण्यातील पक्षी आणि वन्यजीवांना वाहनांच्या आवाजाचा त्रास होऊ नये यासाठी हे साऊण्ड बॅरीअर्स अर्थात ध्वनी रोधक बॅरीअर्स बसविण्यात आले आहेत.मुंबई -गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्यात पळस्पे ते इंदापूर मार्गाचे चौपदरीकरण सुरु आहे. हा राष्ट्रीय महामार्ग कर्नाळा पक्षी अभयारण्यातून जातो. त्यामुळे महामार्ग रुंदीकरणा दरम्यान अभयारण्य लगतच्या परीसरात विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. महामार्गावरून मोठय़ा प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरु असते. यात अवजड वाहनांची संख्या मोठी असते. त्यांच्या आवाजाचा अभयारण्यातील पशुपक्षी आणि वन्यजीवांवर परीणाम होऊ नये. यासाठी ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. महामार्गाला ध्वनीरोधक यंत्रणेचे कवच असले तरीही वाहन चालकांनी हॉर्नचा अनावश्यक वापर टाळणे गरजेचे आहे.


हेही वाचा – अफगाणिस्तानात अकडकलेले भारतीय मायदेशी परतणार, भारताला काबूलमध्ये दररोज दोन विमान उड्डाणांना परवानगी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -