काँग्रेसची उमेदवारी उर्मिलाने नाकारली

congress candidate Urmila Matondkar
उर्मिला मातोंडकर

बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला शिवसेनेकडून विधान परिषेदेची उमेदवारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरूअसून स्वतः उर्मिलाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या उमेदवारीसाठी होकार कळवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, उर्मिला शिवसेनेऐवजी काँग्रेसची पहिल्या पसंतीची उमेदवार होती. अचानक काय चक्र फिरली आणि उर्मिला शिवसेनेकडे गेली, यावर आता काँग्रेसने गौप्यस्फोट केला आहे.

राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या १२ सदस्यांची नियुक्ती होणार असून यात उर्मिलाचा समावेश आहे. काँग्रेस नेते आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली. आम्ही अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना संपर्क साधून विधान परिषदेसाठी विचारणा केली होती; पण त्यांनी विधान परिषदेऐवजी राज्यसभेसाठी इच्छुक असल्याचे सांगत नकार दिला होता, असे वडेट्टीवार म्हणाले. आता जर त्यांनी शिवसेनेची ऑफर स्वीकारली असेल तर त्याचे त्यांना स्वातंत्र्य आहे.

उर्मिला मातोंडकर २०१९ मध्ये झालेल्या लोकसभेच्या आमच्या उमेदवार होत्या. त्या मराठी असून त्यांनी कंगना रानौतच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांना विधान परिषदेवर पाठवावे असे शिवसेनेला वाटणे स्वाभाविक आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले. संजय राऊत यांना उर्मिला मातोंडकरला पक्षाकडून उमेदवारी देण्यासंबंधी विचारण्यात आले असता ते म्हणाले, यासंदर्भात मी देखील चर्चा ऐकत आहे. हा निर्णय मंत्रिमंडळाचा असतो. मंत्रिमंडळात निर्णय घेतले जातात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना यासंदर्भात मंत्रिमंडळाने अधिकार दिले आहेत.