Corona साठी आख्ख्या जगाला मास्क घालून चीन होतंय मास्क फ्री!

beijing going mask free as corona cases decreased

Corona चा पहिला रुग्ण चीनच्या हुबेई प्रांतात सापडला. त्यानंतर Wuhan कोरोनाचं केंद्र बनलं. आणि मग हळूहळू कोरोनानं आख्ख्या जगालाच आपल्या विळख्यात घेतलं. आजघडीला जगभरात कोरोनाचे कोट्यवधी रुग्ण असून तब्बल ७ लाख रुग्णांना आपले जीव देखील गमवावे लागले आहेत. मात्र, असं असताना ज्या चीनमध्ये कोरोनाची सुरुवात झाली, तिथे मात्र आता सारंकाही सुरळीत व्हायला लागलं आहे. विशेष म्हणजे, ज्या चीननं आख्ख्या जगाला मास्क घालायला भाग पाडलं, तो चीन हळूहळू मास्क फ्री व्हायला लागला आहे. आणि याची सुरुवात झाली आहे चीनची राजधानी बीजिंगपासून! बीजिंग प्रशासनाने शहरात मास्क घालण्यासंदर्भातले निर्बंध नुकतेच हटवले असून आता बीजिंगवासियांना मास्क शिवाय शहरात फिरता येणार आहे!

१३ दिवसांत एकही रुग्ण नाही!

गेल्या सलग १३ दिवसांत बीजिंगमध्ये एकही कोरोनाचा नवा रुग्ण सापडलेला नाही. या पार्श्वभूमीवर बीजिंग (Beijing) प्रशासनाने दुसऱ्यांना मास्क घालण्याचे निर्बंध हटवले आहेत. विशेष म्हणजे याआधी देखील एकदा बीजिंगमध्ये अशा प्रकारे निर्बंध हटवण्यात आले होते. एप्रिल महिन्यात बीजिंगमध्ये नवे रुग्ण न सापडल्यामुळे मास्क न घालता बाहेर पडण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र, जूनमध्ये शहरात मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण सापडल्यामुळे पुन्हा निर्बंध घालण्यात आले होते.

…म्हणून चीन होतंय कोरोनाफ्री?

लॉकडाऊनच्या नियमांचं सक्तीने पालन, मास्कच्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी, सक्तीने करण्यात आलेलं होम क्वारंटाईन आणि मोठ्या संख्येने करण्यात आलेल्या चाचण्या यामुळेच चीनमधील (China) कोरोनाला आवर घालणं शक्य झाल्याचा दावा चीनी तज्ज्ञ करत आहेत. मात्र, त्यासोबतच जगभरात अनेक ठिकाणी या नियमांची कठोर अंमलबजावणी होऊन देखील, तिथे कोरोना नियंत्रणात येत नसल्याची टीका देखील आंतरराष्ट्रीय माध्यमांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर जग कोरोनाशी अजूनही लढा देत असताना चीन मात्र हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचं दिसून येत आहे.