घरसंपादकीयओपेडलोकसभा निवडणुकीपर्यंत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री...!

लोकसभा निवडणुकीपर्यंत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री…!

Subscribe

2024 च्या लोकसभा निवडणुकीआधी जोपर्यंत उद्धव ठाकरे किंवा शरद पवार हे महाराष्ट्रातील नेते भाजपबरोबर जाणार नाहीत, तोपर्यंत आणखीन सहा ते आठ महिने तरी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा बदलला जाणार नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाला खरा धोका हा अजित पवार अथवा देवेंद्र फडणवीस या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपासून जितका नाही, त्याहून अधिक धोका शरद पवार अथवा उद्धव ठाकरे यांच्या राजकीय डावपेचांमधून आहे. तरी सगळ्या गोष्टींचा विचार केला तर शिंदेंना लोकसभा निवडणुकीपर्यंत धोका संभवत नाही.

महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीतून आपले समर्थक आमदार घेऊन या सरकारमध्ये सामील झालेले अजित पवार मंत्रिमंडळात आल्यापासून सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदार आणि खासदारांमध्ये चलबिचल निर्माण झाली आहे. त्यामध्ये कालच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजितदादा लवकरच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे ट्विट करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. यामध्ये भरीत भर म्हणून कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहपरिवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी गेल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले.

जणूकाही कालच एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घेऊन अजित पवार यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर बसवतात की काय इतक्या टोकापर्यंत मुख्यमंत्री बदलाची ही अस्थिरता पोहचली होती. या सर्व घडामोडी लक्षात घेतल्या तरीदेखील एक गोष्ट ठळकपणे लक्षात घेण्याची गरज आहे ती म्हणजे 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधी जोपर्यंत उद्धव ठाकरे किंवा शरद पवार हे महाराष्ट्रातील नेते भाजपबरोबर जाणार नाहीत, तोपर्यंत आणखीन सहा ते आठ महिने तरी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा बदलला जाणार नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला खरा धोका हा अजित पवार अथवा देवेंद्र फडणवीस या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपासून जितका नाही, त्याहून अधिक धोका शरद पवार अथवा उद्धव ठाकरे यांच्या राजकीय डावपेचांमधून आहे.

- Advertisement -

अर्थात महाराष्ट्राचे राजकारण जे काही गेल्या वर्ष दीड वर्षापासून कमालीचे बदलले आहे, ते जर लक्षात घेतले तर उद्धव ठाकरे हे 2024 मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपबरोबर जाण्याची शक्यता तशी कमीच आहे. त्यामुळे प्रश्न उभा ठाकतो तो शरद पवार यांच्या भूमिकेबाबत. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार हे नेते असे आहेत की जे आजवर कधीही त्यांची एक भूमिका घेत वाटचाल करत नाहीत. शरद पवार यांच्या राजकीय भूमिका या नेहमीच वादग्रस्त असतात. त्यामुळे केंद्रातील भाजप नेतृत्वाशी जर शरद पवार यांचे सूर आगामी काळात जुळले तरीदेखील ते अजित पवार यांच्याकडे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे जाऊ देणार नाहीत. शरद पवार हे देशातील अत्यंत परिपक्व मुत्सद्धी आणि धूर्त राजकीय नेते आहेत.

अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर पुण्यामध्ये शरद पवार यांची जी पत्रकार परिषद झाली, त्यात शरद पवार यांची दोन उत्तरे ही त्यांची परिपक्वता आणि मुत्सद्धीपणा ठळकपणे अधोरेखित करणारी होती. त्यातील एक उत्तर होते, ते म्हणजे अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार यांच्याकडील राष्ट्रवादी गट हा पक्षाच्या नावासाठी अथवा चिन्हासाठी कोणतीही न्यायालयीन लढाई लढणार नाही, असं त्यांनी त्याच वेळी स्पष्ट शब्दात सांगितले होते आणि दुसरा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न जो होता तो म्हणजे राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा कोण यावर स्वयंस्फूर्तीने त्यांनी दिलेले ‘शरद पवार’ हे अत्यंत समर्पक उत्तर. ही शरद पवार यांच्या आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट करणारी उत्तरे आहेत. या उत्तरांचा स्पष्ट अर्थ म्हणजे अजित पवार हे जरी राष्ट्रवादीच्या काही आमदारांना तसेच काही खासदारांना बरोबर घेऊन राज्यातील सत्तेमध्ये सहभागी झाले असले तरी राष्ट्रवादीचे नेतृत्व हे अजितदादांच्या हाती असू नये अशीच शरद पवार यांची ठाम धारणा आहे.

- Advertisement -

तीच शरद पवार यांची 2004 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरदेखील होती की, ज्या वेळेला काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचे दोन आमदार महाराष्ट्रात अधिक निवडून आले होते आणि राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करणे हे शरद पवारांना अगदी सहज शक्य होते, मात्र तथापि राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करायचा तर सर्वात प्रथम चेहरा जो आहे तो अजित पवार यांचाच पुढे आला असता आणि तसं जर झालं असतं तर उघडपणे अजित पवार यांच्या नावाला नकार देणे हे शरद पवार यांना अडचणीचे ठरले असते. त्यामुळे शरद पवार यांनी उघडपणे अजित पवार यांच्या नावाला विरोध न करता अथवा राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपद न घेता संख्येने दोन आमदार कमी असलेल्या काँग्रेसला मुख्यमंत्रीपद देऊन शरद पवार यांनी त्यांच्या कुटुंबातील संघर्ष हा 2004 मध्येच अत्यंत हुशारीने टाळला होता.

त्यामुळे जे 2004 मध्ये घडले असते ते घडायला पुढे तब्बल 19 वर्षे (2023) जावी लागली याला म्हणतात पवारांची दूरदृष्टी, मात्र तब्बल 19 वर्षे वाट पाहून अजित पवार यांनी धाडस केल्यानंतरही त्यांना उपमुख्यमंत्रीपदावरच समाधान मानावे लागले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता आले नाही हेदेखील कटू सत्य लक्षात घेतले पाहिजे. राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये एक पायाभूत फरक आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या तब्बल 40 आमदारांना आणि १० ठाकरे सरकार समर्थक अपक्षांना स्वतःबरोबर घेऊन जेव्हा भाजपकडे आले आणि राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून ठाकरे आणि त्यांचे समर्थक एकनाथ शिंदे यांच्या सरकारला खोके सरकार, गद्दार सरकार असे संबोधत आहेत, तर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांमधून सध्या विस्तवही जात नाही.

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर दोघांनीही अद्यापपर्यंत एकदाही एकमेकांची प्रत्यक्ष भेट घेतलेली नाही तसेच एकमेकांना साधा फोनही केलेला नाही. उलट शिंदे समर्थक आणि उद्धव ठाकरे समर्थक हे पदोपदी परस्परांना भिडण्याची तसेच खालच्या थराला जाऊन टीकाटिपणी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. या उलट कारभार शरद पवार आणि त्यांचे पुतणे व राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थक आमदारांचा आहे. अजित पवार यांच्या उठावानंतर अथवा बंडाळीनंतर महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन गेल्या आठवड्यापासून मुंबईत सुरू आहे, मात्र या अधिवेशनात शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील मतभेदांचा कोणताही परिणाम राष्ट्रवादीवर पडल्याचे दिसून येणार नाही याची काळजी या दोन्ही काका पुतण्यांनी बरोबर घेतली आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी विरोधी भूमिकेनंतरही शरद पवार समर्थक आमदारांकडून विधिमंडळात अजितदादा अथवा त्यांचे समर्थक मंत्री आमदार यांच्याबाबत कोणतेही अनुद्गार अथवा त्यांच्याविरोधी घोषणाबाजी करण्यात आलेली नाही. त्यामुळे शरद पवार अथवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंतर्मनाचा नेमका शोध घेणे म्हणजे दगडावर डोके आपटण्यासारखे आहे. थोडक्यात जर लक्षात घ्यायचे तर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर जो भडका महाराष्ट्रात उडाला, तसे पवार काका पुतण्यांच्या बाबतीत झाले नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे जाणार की राहणार या प्रश्नाचे उत्तर हे आगामी काळातील शरद पवार यांच्या राजकीय डावपेचांवर अधिक अवलंबून राहणार आहे. जर आगामी दोन-चार महिन्यांमध्ये राज्यातील या राजकीय समीकरणांमध्ये काही लक्षणीय बदल झाले, तर कदाचित एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत भाजप पक्षश्रेष्ठी निर्णय घेऊ शकतील, मात्र तथापि जी जोखीम पत्करून एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून 50 आमदारांना,13 खासदारांना बरोबर घेऊन भाजपबरोबर आले आहेत ती लक्षात घेता दिल्लीतील भाजपचे शीर्षस्थ नेतृत्व हे सद्यस्थितीत तरी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याचा धोका पत्करणार नाहीत.

महाराष्ट्रातून भाजपला खासदारांचा जो 45 चा आकडा निवडून आणायचा आहे तो जर लक्षात घेतला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जे 13 खासदार आहेत ते दिल्लीतील भाजप नेत्यांना अजित पवार यांच्यापेक्षादेखील अधिक महत्त्वाचे आहेत हे येथे लक्षात घेणे गरजेचे आहे आणि त्यावरही जर अजित पवार हे मुख्यमंत्रीपदासाठी 2024 पूर्वी अडून बसलेच, तर शेवटचे सहा महिने का होईना परंतु जर अजितदादांना मुख्यमंत्री करायचे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पूर्णपणे विश्वासात घेतील. त्यांना राज्यातील आणि केंद्रातील सत्तेत सन्मानजनक सहभाग देतील. तडकाफडकी मुख्यमंत्रीपदावरून दूर करणार नाहीत, हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने लक्षात घेण्याची गरज आहे. शरद पवार यांना हे आधीच कळून चुकले असल्याने ते निर्धास्त आहेत.

Sunil Jawdekarhttps://www.mymahanagar.com/author/sunil-jawdekar/
गेली २८ वर्षे वर्तमानपत्र क्षेत्रात कार्यरत. विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय मुद्द्यांवर आणि पायाभूत सेवासुविधांवर लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -