Dussehra 2021 : दसऱ्यासाठी बाजारपेठा सजल्या अन् झेंडूच्या फुलांनी भाव खाल्ला

फुलांची आवक जरी असली तरी शेतक-याला दर समाधानकारक मिळत नाही.

Markets decorated for Dussehra; The price of marigold flowers went up
Dussehra 2021 : दसऱ्यासाठी बाजारपेठा सजल्या अन् झेंडूच्या फुलांनी भाव खाल्ला

दसरा सणानिमित्त घर आणि व्यवसायाचे ठिकाण,वाहने यांना झेंडूच्या फुलांच्या माळांनी सजवले जाते. याकरीता बाजारात याच दरम्यान तयार होणारा गोंडा मोठ्या प्रमाणात विक्रीस उपलब्ध होतो. महाडमध्ये दसरा सणाकरीता एका दिवसातच जवळपास २० टन झेंडू बाजारात दाखल झाला आणि हातोहात या फुलांची विक्री देखील झाली. लाल पिवळया रंगातील झेंडूच्या फुलांनी रांगोळया काढण्यासाठी आणि झेंडूच्या माळांकरीता हा झेंडू मोठया प्रमाणात खरेदी करण्याकरीता एकच गर्दी झाली होती.

कलकत्ता आणि नामधारी फुलांची आवक

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापुर, पुणे, जेजूरी, बारामती, निरा, येथुन झेंडू फुलांची आवक केली जाते. कलकत्ता आणि नामधारी अश्या दोन प्रकारांमध्ये झेंडूच्या फुलांची आवक केली जाते. परंतु सर्व साधारण कलकत्ता जातीची फुलांची अधिक आवक करण्यात येत आहे. राज्यातील बहूतांशी व्यापारी जेजूरी, निरा, वाशी मार्केट, बारामती, पुणे या ठिकाणांहून फुलांची खरेदी करतात. यांतील बराचसा माल मुंबईतील वाशी मार्केटमध्ये विक्री साठी पाठविला जातो. यावर्षी फुलांची आवक जरी ब-यापैकी असली तरी शेतक-याला दर समाधानकारक मिळत नसल्याचे सांगण्यात आले.

शेतकऱ्यांना मिळतील तितक्याच पैश्यावर समाधान मानावे लागते

महाडमध्ये झेंडू फुलांची विक्री करण्यासाठी भोर, सासवड, येथून काही शेतकरी देखील आले असून, पावसामुळे फुलांच्या उत्पन्नावर परिणाम झाला असल्याने जिल्ह्याच्या मार्केटमध्ये दर मिळत नाही त्यासाठी गावागावांमध्ये जाऊन फुलांची थेट विक्री करावी लागते. यामध्ये झालेला खर्च जेमतेम हाती लागत असल्याचे फुलांची शेती करणाऱ्या शेतक-यांनी सांगितले. झेंडूची फुले फार काळ टिकत नाहीत. चोवीस तासांमध्ये फुले सुकून जातात आणि त्यामुळे नुकसान होते. जो दर येईल त्या दरांमध्ये फुलांची विक्री करुन हाती मिळेल त्या पैश्यावर समाधान मानावे लागते आहे. यावर्षी महाडच्या बाजार पेठेमध्ये दोनशे पेक्षा अधिक फुलांची दुकाने थाटण्यात आली असून, वीस टनपेक्षा अधिक फुले विक्रीसाठी आहेत. सर्वसाधारण पन्नास ते साठ रुपये किलोने विक्री होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

दसर्‍यानिमित्त व्यापारी दुकानांतील वजन काट्यांची पूजा करतात, फुलांची तोरणे लावली जातात. लहानपणी शाळेमध्ये मुले सरस्वती पूजन करण्यासाठी आवर्जून जात असत. परंतु कालौघात आता शाळेमध्ये सरस्वती पूजनाचा कार्यक्रम जरी केला जात असला तरी हा कार्यक्रम सार्वजनिक असतो. याकरीता देखील झेंडूच्या फुलांचा वापर केला जातो. शिवाय वाहनांना सजविण्यासाठी किंवा वाहनांची पूजा करण्यासाठी झेंडूचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. शहरातील शिवाजी चौक परिसरामध्ये बहुतांशी फुलांची दुकाने रस्त्याच्या बाजूला मांडण्यात आली आहेत. औद्योगिक परिसरातही अशी दुकाने थाटण्यात आली आहेत. साधारण ५० रुपयांपासून ८० रुपये प्रति किलो फुलांची विक्री होणे अपेक्षित आहे. मात्र यावर्षी १०० रुपये दराने विक्री होत आहे.


हे ही वाचा – Navratri 2021: मराठमोळ्या अभिनेत्रींनी धरला भोंडल्यावर ताल