घरताज्या घडामोडीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

जो का तुम्हीं शिक्षापिला | विद्या देऊनि कुरुठा केला | तेणें हा सैन्यसिंहु पाखरिला | देख देख //
ज्या धृष्टद्युम्नाला तुम्ही पढवून विद्येचे आगर केले, त्याने हा सेनासमुद्र चहूकडे पसरविला आहे तो पाहा.
आणीकही असाधारण | जे शस्त्रास्त्रीं प्रवीण | क्षात्रधर्मीं निपुण | वीर आहाती //
याशिवाय आणखी शस्त्रास्त्रांत प्रवीण व क्षात्रधर्मांत निपुण असे महान- महान योद्धे आहेत.
जे बळें प्रौढी पौरुषें | भीमार्जुनांसारिखे | ते सांगेन कौतुकें प्रसंगेंची //
जे बलाने, योग्यतेने व पुरुषार्थाने भीमार्जुनांसारखे आहेत यांचे सहज प्रसंगानुसार वर्णन करतो
एथ युयुधानु सुभटु | आला असे विराटु | महारथी श्रेष्ठु | द्रुपद वीरु //
या ठिकाणी महायोद्धा युयुधान, विराट राजा आणि श्रेष्ठ महारथी द्रुपद राजा हे आले आहेत.
चेकितान धृष्टकेतु | काशिराज वीर विक्रांतु | उत्तमौजा नृपनाथु | शैब्य देख //
चेकितानल, धृष्टकेतु, पराक्रमी असा काशिराजा, नृपश्रेष्ठ उत्तमौजा व शैब्य राजा यांकडे पाहा;
हा कुंतिभोजु पाहें | एथ युधामन्यु आला आहे | आणि पुरुजितादि राय हे | सकळ देखे //
हा कुंतिभोज पाहा, तसाच तेथे हा युधामन्यु आलेला आहे आणि पुरुजित् आदिकरून सर्व राजे आले आहेत ते पाहा.
हा सुभद्राहृदयनंदनु | जो अपरुनवार्जुनु | तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनु | देखें द्रोणा //
दुर्योधन म्हणतो:- अहो द्रोणाचार्य, हा पाहा, सुभद्रेच्या अंत:करणाला आल्हाद देणारा तिचा मुलगा प्रतिअर्जुन असा अभिमन्यु.
आणीकही द्रौपदीकुमर | हे सकळही महारथी वीर | मिती नेणिजे परी अपार | मीनले असती //
तसेच आणखी हे द्रौपदीचे मुलगे व सर्व महारथी ज्यांची गणतीकरिता येत नाही असे असंख्य वीर या ठिकाणी जमले आहेत.
आतां आमुच्या दळीं नायक | जे रूढवीर सैनिक | ते प्रसंगें आइक | सांगिजती //
आता आमच्या सैन्यांत प्रमुख असे महावीर कोण-कोण आहेत ते प्रसंगानुरोधाने सांगतो, ऐका.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -