घरसंपादकीयओपेडरस्त्यावर खड्डे तर असायलाच हवेत...!

रस्त्यावर खड्डे तर असायलाच हवेत…!

Subscribe

खड्ड्यांना जिवंत माणसांविषयी खूपच आत्मियता असते, मग तुम्ही मुंबई किंवा जुणेजाणते ठाणेकर असलात तरी काहीच फरक पडत नाही. खड्डे भेदभाव बिलकूल करत नसतात, खड्डे सगळ्यांना एकाच समानतेने पाहतात. महिला, पुरुष, लहान मुले किंवा वृद्ध असा कुठलाही फरक खड्डे करत नसतात. त्यामुळे खड्डे समानतेचे पाईक असतात. सोबतच खड्ड्यांमध्ये पराकोटीचे जीवनविषक तत्वज्ञान दडलेले असते. खड्डे कायमचे बुजवल्यास देह आणि मन या दोन्ही पातळ्यांवर मिळणार्‍या धक्क्यांच्या त्या अवर्णनीय आत्मानुभूतीपासून माणसांना दूर केल्यासारखे होईल.

कुत्र्यांच्या छत्रीसारखेच खड्डे पावसाळ्यात उगवत तर नाही, खड्डे त्याआधीही असतात, मात्र पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचल्यानंतर त्यांची खोली दिसेनाशी होती, अगदी माणसाच्या मनासारखी. अशी कित्येक माणसे महापालिकेत अधिकारपदावर कार्यरत असतात. त्यातील काही नगरसेवक नावाचे लोकप्रतिनिधीही असतात. नगरसेवकांना नगरांची सेवा करण्यासाठी जनतेने मतातून निवडून दिलेले असते. मात्र अनेकदा नगराचे सेवक स्वपक्षाची, खड्डे बुजवण्याचे दरवर्षीचे कंत्राट मिळवलेल्या ठेकेदाराची किंवा महापालिकेतील वरिष्ठ अधिकार्‍यांचीच सेवा करताना दिसतात. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळा सुरू असताना, खड्ड्यांच्या नावाने शिमगा केला जातो.

- Advertisement -

मात्र खड्ड्यांचे गुण कोणीही विचारात घेत नाही. खड्डे टिकायलाच हवेत. खड्डे बुजवणे हे फार मोठे पापकर्म असते. पालिकांनी त्यांच्या अखत्यारित असलेल्या नगरांमध्ये टिकणारे रस्ते साकारण्याचे पाप करायलाच नको. खड्डेमय रस्ते ही पालिकेची राजकीय अशी सर्वात जुनी संस्कृती आहे. पालिका ठेकेदारांच्या, अधिकार्‍यांच्या ‘भरणपोषणाचं’ काम करणारे खड्डे ही खरंतर लोकसेवा आहे. काही नादान नागरिक आणि राजकीय नेतेही रस्त्यांवर खड्डे नसावेत, असं ‘हवेत’ बोलून जातात. त्यांना सूज्ञ आणि लोकशाही नागरिकांनी, ‘खड्डे हा आमचा राजकीय हक्क आहे त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी आम्ही प्राणपणाने खड्ड्यांच्या रस्त्यांवर लढू’ असा इशारा द्यायला हवा.

माणूस खड्ड्यात गेला, खड्ड्यात जा…, आपल्या हाताने आपल्यासाठीच खड्डा खोदणे, असे कित्येक प्रचारातली वाक्ये आपण ऐकलेली, बोललेली असतात. माणूस मृत्यूनंतर स्वर्गात किंवा नरकात जातो, मात्र त्याला बोलण्यातून ‘खड्ड्यात पाठवणे’ म्हणे स्वर्ग आणि नरकाहूनही जगात खड्डा नावाची तिसरी जागा आहे. हा तिसर्‍या जागेचा शोध भारताच्या उज्ज्वल शोध परंपरेचे जिवंत उदाहरण ठरावे. ठाण्यातील कित्येक रस्त्यांवरचे खड्डे हा खरोखरच त्या परमपित्याला भेटण्याचा मार्ग ठरत असताना खड्ड्यांना होणारा विरोध हा थेट माणसाच्या आध्यात्मिक अधिकाराला होणारा विरोध असल्याचे येथे स्पष्ट करायला हवे. खड्डे काय देत नाहीत हो…? खड्डे राजकीय आंदोलनाची सोय करून देतात, अशा आंदोलनात खड्ड्यांमध्ये प्रतिकात्मक मासे पकडले जातात, रस्त्यावरच्या खड्ड्यांमध्ये झाडे लावून पर्यावरणाच्या रक्षणाचा कितीतरी मोलाचा संदेशही दिला जातो. खड्ड्यांमुळे वाहतुकीत एक प्रकारची शिस्त येते. बेशिस्त वाहनचालकांसाठी ठाणे, केडीएमसी, अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर भागातल्या गल्लीबोळात ज्याप्रमाणे मन मानेल त्या रस्त्यावर लांबी, उंचीचा विचार न करता कुठेही गतिरोधक उभारले जातात. त्याचप्रमाणे खड्डेही विनामोबदला हे काम करून देतात. गतिरोधकाला तरी किमान डांबर, सिमेंटचा खर्च करावा लागतो. खड्डे नैसर्गिक असल्याने हा खर्च वाचतो.

- Advertisement -

पालिकांच्या निर्मितीपासून खड्ड्यांनी मुंबई, ठाणेकरांना भरभरून दिले आहे. झाडे तोडण्याच्या धर्तीवर खड्डे बुजवणेही गुन्हा मानायला हवा. खड्ड्यांमुळे मान, पाठीचे दुखणे बळावते…असे म्हटले जाते. हा आरोपही धादांत खोडसाळपणातून केला गेलेला आहे. हे खड्डे पाहण्यासाठी अपोलो 11 हे यान चंद्रावर अमेरिकेने उतरवल्याचं शाळेत असताना शिक्षकांनी शिकवलेलं होतं. चंद्रावरील खड्ड्यांचा अनुभव घेण्यासाठी अमेरिकेने इतके संशोधन, यानाची निर्मिती, चांद्रमोहिमेतील प्रकल्पाच्या कित्येक डॉलरचा खर्च करणार्‍या अमेरिकेने हे ध्यानात घ्यायला हवे की, आपल्याकडे खड्ड्यांचा चंद्र अनुभवण्याचं काम इथल्या महापलिकाच किती कमी खर्चात करून देतात. तेही महापालिकांना मिळणार्‍या केंद्र, राज्याचा निधी या कामासाठी न वापरता. या एकाच उदाहरणावरून अमेरिकेतील अवकाश संशोधन संस्था आपल्याकडील महापालिकांच्या तुलनेत अजूनही कित्येक पटीत मागास आहेत. या एकाच उदाहरणातून अमेरिका आपल्या देशातल्या केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तुलनेत मागास आणि बिनडोक विचारांचा देश असल्याचं स्पष्ट व्हावं.

आपण स्वघोषित जगद्गुरू असल्याने आंतरराष्ट्रीय परिषदेत अमेरिकेचे आपण याआधीच कान खेचण्याचे काम करायला हवे होते. असो, खड्ड्यांमुळे हातावर आणि मीटरवर पोट असलेले रिक्षाचालक रस्त्यावर उतरतात, हा आणखी एक मूर्खपणा झाला. खड्ड्यांमुळे वाहने तांत्रिक कामे काढत असल्याने त्यासाठी होणारा खर्च आणि रिक्षाचे हप्ते भरताना नाकी नऊ येत असल्याचा आरोपही निखालस खोटा आहे. रिक्षा, एसटी बसेस, सार्वजनिक वाहतुकीचं नुकसान खड्ड्यांमुळे होतच नाही उलट यातून वित्तीय विकेंद्रीकरणाला पर्याय निर्माण होतो. खड्ड्यांमुळे वाहतूक व्यवस्थेकडे आलेल्या रकमेतील काही रक्कम गॅरेजवाले, वाहनांची दुरुस्ती, वाहनचालकांची मान, पाठ मोडून आल्यामुळे झालेला वैद्यकीय खर्च यात वाटली जाते. त्यामागे आर्थिक नियोजनाचा उद्देशच साध्य केला जातो. एक खड्डा वाहतुकीशी संबंधित अनेक घटकांचे पोट भरण्यासाठी कामाला येतो, हा लाभ खड्ड्यांना विरोध करणारे मुळी ध्यानातच घेत नाहीत.

खड्ड्यांमुळे अपघात होत असल्याचा आरोपही बिनबुडाचा आहे. आपल्या देशात दुचाकींची संख्या ही चारचाकी वाहनांच्या संख्येच्या तुलनेत दुपटीने अधिक आहे. अशा परिस्थितीत दुचाकींना खड्ड्यांमुळे मोठा धोका संभवतो असे रस्त्यावरील झालेल्या अपघाताच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. या अपघाताला खड्डे बिलकूल कारण ठरत नाहीत. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी भरत असल्याने खड्ड्यांची खोली न जाणता वाहनचालक आपली वाहने वेगावर नियंत्रण न ठेवता तशीच दामटवतात. त्यामुळे दुचाकीस्वारांचे संतुलन बिघडून वाहने रस्त्यावर घसरतात. खड्डे एका अर्थाने वेगावर नियंत्रण ठेवण्याचं काम करत असतात. तेही वाहतूक विभाग, सरकारकडून कुठलाही पगार न घेता. खड्ड्यांचा हा दिलदारपणा कोणी विचारात घेत नाही. खड्डे मानवी विकासाला पूरकच असतात. ‘एखाद्या ठिकाणी खड्डा पडला की, दुसर्‍या ठिकाणी डोंगर उभा’ राहतो. हा निसर्गनियम आहे, जो खड्डे आपल्याला शिकवतात. आपल्याकडे खड्ड्यातून महापालिकांना पोसणारे कित्येक रकमेचे डोंगर याआधी उभारले गेलेले आहेत. हे महनीय काम खड्डे बुजवल्यामुळे धोक्यात येते, त्यामुळे खड्डे गरजेचे असतात. खड्ड्यांना आकार नसतो, खड्डे सामाजिक समतेचा संदेश देतात. एखादी उच्चभ्रू महागडी आलिशान गाडी असो किंवा रस्त्यावर हातगाडी खेचणारा मजूर असो खड्डे प्रत्येकाला समान न्याय देत ‘जमिनीवर आणतात’. वाहन खड्ड्यात गेल्यावर वाहनचालक खड्ड्यांना शिव्या देतात, खड्डे मात्र वर्षानुवर्षे आपले काम कुठलाही रागलोभ न करता प्रामाणिकपणे करत असतात.

मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, दिवा, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर, आदी भागांतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. या खड्ड्यांना कंटाळून नागरिक आपली खासगी वाहने बाहेर काढत नाहीत. त्यामुळे रेल्वेच्या महसुलात वाढ होते आणि प्रदूषणही कमीच होते. खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होते असा आरोपही चुकीचाच म्हणावा…वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे नागरिकांच्या संयमाची परीक्षा घेतली जाते. संयमी नागरिक हा शांत लोकशाहीचा आधार असतो. कोंडीत तासनतास अडकल्याने नोकरी, व्यवसाय आणि कामाचे तास कमी झाल्याचा लाभच होतो. एकाच ठिकाणी वाहन अर्धा तास खोळंबून राहिल्याने वाहनातील नागरिकांना विश्राम आणि आत्मचिंतनाची संधी मिळते. मुंबई पुण्यासारख्या नेहमीच धावणार्‍या शहरांसाठी असा निवांतपणा अभावानेच मिळतो. खड्ड्यांमुळे ही संधी मिळते, शिवाय चिंचोळ्या मार्गातून बळजबरीने दुचाकी काढणे, शिस्त मोडून दुसर्‍याच लेनमध्ये शिरणे आदी वाहतुकीचे आपत्कालीन धडेही फुकटात शिकायला मिळतात. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी, मग जोरदार पावसाआधी, त्यानंतर गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्याचे आवाहन महापालिकांना केले जाते. पालिकांचे याविषयीची उदात्त धोरण कोणीच लक्षात घेत नाही. गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवल्यास आणि रस्ते दुरुस्ती केल्यास विघ्नहर्त्याकडे खड्ड्यांचे हे विघ्न घालव रे बाबा…असं भक्तीचे आर्जव कोण करेल? त्यामुळेच हे खड्डे श्री गणपती आणि गणेशदेवावर श्रद्धा असलेल्यांमध्ये सेतूचे काम करतात.

सेतूवरून आठवलं…ठाणे, मुंबईतील अनेक सेतू (पुलांवरही) खड्डे पडल्याच्या बातम्या येतात. पुलांवरील खड्डे हे जाणीवपूर्वक ठेवले गेलेले असतात. पुलांवरून ये-जा करताना वाहनचालक माणसं ‘चढण्याचे आणि उतरण्याचे’ काम करतात. यातून जीवनाचे मोठे तत्वज्ञान शिकवले जाते. जो खूप खूप वर चढतो, उंचावर पोहचतो त्याला कधीना कधी खाली यावेच लागते. पुलावरील खड्ड्यांचे हादरे ‘उंचावर’ गेलेल्या माणसांना जमिनीवर आणण्याचे काम करतात. खड्डे खचितच वाईट नसतात. ‘खड्ड्यात जा…गेलास खड्ड्यात’ असं बोलून माणसांनी खड्ड्यांना बदनाम केलं आहे. शेवटी प्रत्येकाला अखेरच्या क्षणी त्याच्यासाठी खोदलेल्या अखेरच्या खड्ड्यात जावंच लागतं. जीवन क्षणभंगूर आहे, मिथ्या आहे. मोहमाया आहे. खड्डे या आध्यात्मिक वास्तवाचे भान करून देतात.

खड्ड्यांमध्ये ऐन पावसाळ्यात कोल्डमिक्स टाकून बुजवण्याची कामे केली जातात. ओल्या कागदावर रंग टाकून चित्र साकारण्यासारखा हा प्रकार असतो. कोरड्या कागदावर चित्र साकारणे सोपे असते. ओल्या कागदावर जो चित्र साकरतो तो खरा चित्रकार…मग ते चित्र गूढ, विचित्र झाल्यावर त्याला अब्स्ट्रॅक्ट असं नाव देता येतं. सहज समजणार्‍या चित्रापेक्षा अशा चित्राला मोठी किंमत मिळते म्हणे. रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते…महानगरांमधील रस्त्यांची वर्षानुवर्षे अशी स्थिती ठेवल्यामुळे वर्षानुवर्षे निधीच्या विकासकामांचा निधी मिळवता येतो. सोन्याची कोंबडी आणि अंडं…या कथेतील सार हेच आहे. खड्डेमुक्त रस्ते साकारणे म्हणजे सोन्याचं अंडं देणारी कोंबडी ‘खूड’ करून टाकण्यासारखं आहे. खड्डे माणसाला जगणं शिकवतात, खड्ड्यांमध्ये फार मोठे आध्यात्मिक तत्वज्ञान लपलेले असते, ते कायमचे बुजवल्यास या तत्वज्ञानाच्या वर्षानुवर्षे मिळणार्‍या गोड फळांना येथील मानव कायमचे मुकतील…हाच महनीय हेतू खड्ड्यांना कायम ठेवण्याचा आहे, म्हणूनच खड्डे गरजेचे आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -