घरसंपादकीयओपेडनोटांवरची चित्रे, बापूजींच्या वेदना आणि आपली संवेदना !

नोटांवरची चित्रे, बापूजींच्या वेदना आणि आपली संवेदना !

Subscribe

महनीय माणसाचे चित्र नोटांवर छापल्यानं अशा नोटा त्या त्या महापुरुषांचे अनुयायी निष्ठेने गोळा करतील, त्याला तुम्ही चलनाची साठेबाजी, काळा पैसा दडविला असं म्हणत स्वतःच्या इतिहासाचा उपमर्द कराल, सर्वसामान्यांच्या खिशात अशी कित्येक चित्रे गोळा केली जातील, परिणामी रुपयाचा दर डॉलरच्या तुलनेत निश्चितच वाढणार आहे. भारतीय चलनावरच्या देवदेवतांच्या फौजेपुढं अमेरिकेच्या फ्रँकलीनची काय ती बिशाद...? भस्म करून टाकू त्याला, कोण आहे रे तिकडे....सरकारनं याविषयी तातडीनं पावलं उचलावीत, उद्याची जागतिक ‘महा’सत्ता चलनाच्या एका प्रिंटेत जगाच्या आर्थिक स्पर्धेत एका फटक्यात कित्येक दशकं पुढं भरारी घेईल. त्यामुळं डॉलर ताकदीचा होऊन त्यामुळे रुपया कमकुवत होण्याच्या नतद्रष्ट बातम्याही कायमच्या बंद होतील.

लोकप्रिय लेखक ऑस्कर वाईल्डची ‘द स्टॅच्यू अँड दि स्वॅलो’, अर्थात पाकोळी पक्षी आणि पुतळा या कथेवर आधारीत धडा आठवीच्या इंग्रजीच्या पुस्तकात होता. ज्यात एका कुठल्याशा महानगराच्या मध्यभागी उंचावर हिरेजवाहीर जडीत तलवारधारी राजकुमाराचा स्मारकरुपी सोन्याचा पुतळा होता. हा पुतळा नगरातील धनाढ्यांनी मिळून साकारला होता. त्यामुळे पुतळ्यावर त्यांची मालकी होती. हा पुतळा नगरातील सर्वात उंचावर आणि मध्यभागी असल्यानं राजकुमाराला नगरातील दुःख, दैन्य, गरीबी पाहण्यावाचून गत्यंतर नव्हतं, सभोतालच्या उपासमारांची आक्रंदने ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता. भुकेल्या लहान मुलांच्या चित्कारामुळे या राजकुमाराची शांतता लोपली होती. हे दुःख पाहून राजकुमार अश्रू ढाळत असे, एकदा एक स्थलांतरित पाकोळी पक्षी या राजकुमाराच्या खांद्यावर जाऊन अनाहूतपणे बसला.

हा हिरेजडीत ‘सोन्याच्या’ राजकुमार अश्रू का ढाळत आहे, असे पाकोळी पक्ष्याने पुतळ्याला विचारले असता, राजकुमाराने सभोवताली दिसणारे दुःख, दैन्याचे कारण सांगितले आणि पाकोळी पक्ष्याला विनंती केली की तुझ्या टोकदार चोचीने माझ्या डोळ्यांमध्ये बसवलेले हिरे, अंगावरील थोडे थोडे सोने, रत्नजवाहिर, माणके, एकेक अलंकार तोडून घे आणि माझ्या सभोवताली या नगरात दारिद्य्रात पिचलेल्या लोकांना एक एक करून नेऊन दे, पाकोळी पक्ष्याने ही विनंती मान्य केली, राजकुमाराच्या अंगावरील एकेक अलंकार चोचीने तोडून त्यातला एकेक हिरमाणकाचा मणी त्याने नगरातील गोरगरीब भुकेकंगाल लोकांच्या खोपटात नेऊन टाकला. हिरे माणकं, अंगावरील अलंकार सोने आणि हिर्‍यांचे डोळेही तोडून नेल्यामुळे राजकुमार आता विद्रूप दिसू लागला, या स्मारकाभोवती केरकचर्‍याचे ढीग साचले. पुढे नगरातील सत्ताधार्‍यांनी या विद्रूप, भयंकर, कुरूप अशा राजकुमाराचा पुतळा कालांतराने बुलडोझरने जमीनदोस्त केला.

- Advertisement -

या कथेतील राजकुमाराकडे धनाढ्यांच्या पारतंत्र्यांतून सुटका करुन घेण्यासाठी आणि गोरगरीबांचे दुःख, दैन्य संपवण्याचा ‘अलंकारी’ सुटकेचा मार्ग होता. देशाच्या चलनावर असलेल्या राष्ट्रपित्याकडे मात्र असा कुठलाही पर्याय इथल्या व्यवस्थेने ठेवलेला नाही. या चलनावरच्या चित्रातून हा महात्मा स्वतःच्या चित्ररुपी चकचकीत कागदाचा होणारा काळाबाजार, बेकायदा खरेदी विक्री, खोके आणि धोके, पेट्यांचे व्यवहार, धनाढ्यांच्या इन्हेंटरुपी कार्यक्रमात स्वतःची होणारी उधळण नाईलाजाने पाहत असतो. हा नाईलाज इतर नेत्यांमध्ये वाटला गेल्यास महात्म्याच्या आत्म्याची वेदना काहीशी कमी होईल, हाच उदात्त हेतू केजरीवालांनी नोटांवरील चित्रांचा विषय छेडून व्यक्त केला असावा, ज्यांना प्रत्येक गोष्टीत राजकारणच दिसतं, हा त्यांचाच दोष आहे.

भारतीय चलनाच्या नोटांवर महनीय व्यक्तीमत्वांची चित्रे छापणाचे इतर अनेकही फायदे आहेतच की, चलनावर नवे फोटो आल्यानंंतर भारताच्या नेतृत्वाविरोधात ‘इथं फोटो काढला, तिथं फोटो काढला’, असे होणारे बिनबुडाचे आरोप यापुढं होणार नाहीत, कारण देशातले झाडून सगळेच इतिहासातले दिग्गज आता नोटांवर फोटोरूपात झळकणार आहेत. फोटो काढण्याला देशाचा राष्ट्रीय छंद म्हणून मान्यता मिळेल, या फोटोंमुळे रुपया हिमालयच नव्हे तर मोठी झेप घेऊन एव्हरेस्टही सेकंदात चढून जाईल आणि डॉलरची किंमत रस्त्यावरच्या खड्ड्यातून कर्ज काढून घेतलेली स्कुटर बाहेर काढतानाही उगाच बिनकामाचं जास्तीचं पेट्रोल जळतंय या धास्तीनं इंजिन बंद करून दोन्ही पायांवर जोर लावणार्‍या दुचाकीस्वारासारखी होईल.

- Advertisement -

उद्याची महासत्ता तातडीनं हा निर्णय घेईल अशी भीती वाटल्यानं अर्थव्यवस्थेवर लक्ष ठेवणार्‍या जागतिक संस्था, जगभरातले अर्थतज्ज्ञ आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी परिषदेच्या पोटात आधीच गोळा आलेला आहे. जसं नोटाबंदीनंतर नव्या नोटांमध्ये आपल्या पुरातन इतिहासात ‘आपणच’ शोधलेली मायक्रोचिप बसवल्याची बातमी पसरली आणि तिकडं नासाच्या नाकात दम आणला होता, हे काहीसं असंच आहे. थाळ्या वाजवून दिवे लावून कोरोना पळवून लावल्यानंतर आपण जगभरातील वैद्यकशास्त्रांना आपल्यासमोर झुकायला लावले, असंच अनोखं जगावेगळं काहीतरी करण्याची संधी आता ‘आपणंच जुने जाणते उद्गाते असलेल्या या अर्थशास्त्रीय छायाचित्र संशोधन सिद्धांतातून सिद्ध करण्याची ही मोलाची संधी आपल्याला नोटांवर चित्रे डकवण्याच्या निमित्ताने मिळाली आहे, ही संधी सोडता कामा नये.

नोटाबंदी, डिजिटल करन्सीच्या पुढं जाणारा हा नवा देश आहे. या नव्या अर्थक्रांतीचा बिगुल अरविंद केजरीवाल यांनी फुंकला आहे. केजरीवालांची त्यामागील उदात्त भावना आपण लक्षात घ्यायला हवी. याआधी नोटांची काळी पांढरी आर्थिक नौतिकता संभाळण्याची जबाबदारी एकट्या बापूंची होती, मात्र बापू आता स्वच्छ अभियानाच्या कामात कमालीचे बिझी झाल्यानं, नोटा सांभाळण्याची जबाबदारी विभागली जाणं महत्वाचं आहे. बापूंची छबी असल्यानं नोटांचा काळाबाजार होणंच शक्य नव्हतं, तसा तो झालाही नाहीच, रिझर्व्ह बँकेच्या आपत्कालीन वापराच्या चलन तिजोरीत खडखडाट असल्याच्या आणि निश्चलनिकरणानंतर बाजारात सोडलेल्या नव्या नोटांच्या तुलनेत जवळपास जुने चलन रिझर्व्ह बँकेकडे परत आल्याच्या बातम्या निव्वळ खोडसाळपणातून केल्या गेलेल्या आहेत. निश्चलनीकरणानंतर नव्याच्या तुलनेत सर्वच जुने चलन परत बँकेकडे आल्यामुळे ‘बघा आम्ही म्हणत होतो ना, भारत देशात भ्रष्टाचार नावालाही नाही’ या विधानाला पुष्टीच मिळाली आहे. सोबतच दहशवादी कारवायांसाठी काळे चलन वापरले जात असल्याची भीतीही नाहीशी झाली आहे. त्यामुळे पर्यायाने देशात दहशवाद सक्रीय नसल्याचेच स्पष्ट झाले नाही काय? अशी आपलीच पाठ आपण थोपटून घ्यायला मोकळे झालो आहोत. खर तर अर्थशास्त्रातला यंदाचं नोबेल आपल्यालाच मिळायलं हवं होतं, पण ‘त्यांच्यात’ ही दानतच नाही, हेही या निमित्त सिद्ध झालं आहे.

नोटांवरील चित्रे बदलण्यास त्यातून अनेक उद्दिष्टं साध्य होतात. देशाच्या जुन्या दहा रुपयांच्या नोटेमध्ये बापूजी त्यांच्या चष्म्यातून उजवीकडून डावीकडे कटाक्ष टाकत असल्यानं आपल्या उदात्त राजकीय संस्कृतीचा होणारा र्‍हास कोणाच्याच लक्षात आला नाही, निश्चलनीकरणानंतर आलेल्या नव्या दहा रुपयांच्या नोटेवर बापूजी डावीकडून उजवीकडे पाहत आहेत. आपली संस्कृती डावीकडून उजवीकडे जाते. उजवीकडून डावीकडे जाणारी संस्कृती मूल्ये मानणार्‍यांनाही ही चपराक आहे. हे ध्यानात यायाला ‘हाडाचे’ देशप्रेमी असायला हवेत. आपल्या संस्कृतीप्रती आत्मियता असायला हवी, जी इथल्या बौद्धिक पामरांमध्ये रुजवण्याचं काम या नोटाबंदीनं साध्य केलं. यातून डावे आणि उजवे यांच्यातील राजकीय समतोलही साधला गेला आहे, ही आणखी जमेची बाजूच म्हणायला हवी. हे दोघेही नव्या महासत्तेच्या नव्या अर्थव्यवस्थेसाठी या महापुरूषांच्या नोटांवर छापलेल्या चित्रांकडे पाहून प्रेरणा घेऊन एकदिलानं काम करतील, नोटांवर प्रतिमास्वरुप देवादिकांचा चित्ररुपी छापील आशीर्वाद मिळाल्यावर कुठल्याही धर्म जातीच्या माणसांना, पुरोगामी, प्रतिगामी, आस्तिक, नास्तिकांनाही आपलेच देव खिशात बाळगून फिरण्याचा नाईलाज होईल, केजरीवालांचा हा मास्टरस्ट्रोक आहे.

चलनावर महापुरुषांची छायाचित्रे छापल्यानंतर ज्या देशात चलनाची लक्ष्मी म्हणून नुकतीच दिवाळीत आपण पूजा केली त्या चलनाला ‘पेटी‘ आणि ‘खोके’ संबोधण्याचा अवमान होणार नाही. तर देशातल्या दरिद्री, कमालीचे गरीब आदिवासी आणि अगदी ज्यांच्याकडे पिवळ्या रेशनकार्डाचीही मारामार आहे, अशा तळागाळातल्या ‘कागदोपत्री नसलेल्या’ नागरिकांना नोटांवरचे महात्मा गांधी अभावानेच पहायला मिळत होते. सरकारी योजनेतून खड्या निर्धाराने बापूजी काठी टेकत टेकत या गोरगरीबांकडे जायला निघायचे हे खरेच, मात्र गांधीजींचे ‘निस्सिम चाहते’ केवळ आणि केवळ त्यांच्या चित्रांच्या प्रेमातून त्यांचे मधल्यामध्येच अपहरण करत होते, प्रशासकीय किंवा यंत्रणेतील सनदी अधिकारी, घोटाळा हा शब्दच माहीत नसलेल्या सत्तेतील जबाबदार नेत्यांचे हे प्रेम पाहून बापूजी भारावून जात होते. असेच प्रेम इतर महनीय नेत्यांना मिळाले तर कुणाच्या पोटात दुखायचे कारण नाही.

नोटाबंदीनंतर देशातल्या जवळपास निम्म्या नोटा मार्केटमधून गायब असल्याची बातमी खोडसाळपणा नाही, बापूंप्रती असलेल्या प्रेमातूनच त्यांना लपवून तिजोरीबंद करण्याची ही अहमहमिका राष्ट्रपित्यांवरील प्रेमाचीच उदाहरणे ठरावीत. हृदयात असलेले गांधी हृदयातून हदयाजवळच्या शर्टाच्या खिशातही येत असतील तर वावगे काय? या पोलादी तिजोरीच्या तुरुंगातून दडवलेल्या कित्येक आयाताकृती चकचकीत कागदातून बापूंची सुटका होणं आता शक्य होईल, जरी सुटका झाली नाही तरी नाही म्हणायला महात्म्यांच्या सोबतीला आता महापुरुषांची, देवतांची फौज येईल, त्यामुळे बापूंना नक्कीच दिलासा मिळेल, या तिजोरीला तुरुंग मानून येथून सुटका होऊन बापूंनी गोरगरीब आदिवासी, भुकेकंगालांच्या फाटक्या खिशात जाण्यासाठी आमरण उपोषण आंदोलन सुरू केलं होतं.

आता त्यांच्या उपोषणात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्यासह देवदेवतांचीही साथ मिळाली तर तुम्ही आडवे का जाताय? इथं तर चक्क प्रधानसेवकानांही त्यांच्या चित्रातून या उदात्त कामासाठी संधी देण्याची मागणी होत आहे. त्यातून बापूंच्या लढ्याला आत्मिक बळच मिळेल, यातून चित्रांसोबत छायाचित्रांचा छंद आणि उद्देश दोन्हीही साध्य होतील, काळा पैसा काळा राहाणार नाही, आर्थिक नैतिकता साध्य केली जाईल, भ्रष्टाचार, घोटाळ्यांना लगाम बसेल, बँकांची कर्जे बुडवून परदेशात पळून जाणार्‍यांना नोटेवरील छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार आडवी जाईल. तथागत बुद्धांच्या नोटांवरील चित्रामुळे बुद्धकाळातली संपन्नता, सुबत्तता आणि सोन्याचा धूर पुन्हा येथील विझलेल्या थंडगार चुलींमधून निघेल. तर सामाजिक सुधारणेशिवाय आर्थिक सुधारणेला अर्थ नसल्याचे स्पष्ट करणार्‍या अर्थतज्ज्ञ बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र नोटांवर आल्यास यातील दरी आणि फरक ताबडतोब नाहीसा होईल.

नोटांवर चित्रे छापण्यामागे असलेला हा उदात्त विचार समजण्याची कुवत तुम्हा सामान्य माणसांमध्ये नाही…..माणसांच्या चित्रात त्याच्या पोटातली भूक दिसत नाही, मात्र कुठल्याही विषयात ओढून ताणून गरीबी, भूक, दारिद्य्र पाहण्याची सवय लागलेले कर्मदरिद्री तुम्ही, तुम्हाला ही महनीयता, उदात्तता कळणारच नाही, तुमच्या बुद्धीचा त्रिवार निषेध, देशद्रोही कुठले…?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -