घरताज्या घडामोडीआशयघन काव्याचे जनक वसंत बापट

आशयघन काव्याचे जनक वसंत बापट

Subscribe

बापट वसंत हे सुप्रसिद्ध मराठी कवी, वक्ते, कलावंत होते. त्यांचा जन्म 25 जुलै 1922 रोजी सातारा जिल्ह्यातील कराड याठिकाणी झाला. पुण्याच्या स.प. महाविद्यालयातून एम.ए.(१९४८). त्यानंतर मुंबईतील ‘नॅशनल कॉलेज’ आणि ‘रामनारायण रुईया कॉलेज’ या महाविद्यालयांतून मराठी आणि संस्कृत विषयांचे प्राध्यापक होते. १९७४ पासून मुंबई विद्यापीठातील गुरुदेव टागोर अध्यासनाचे प्राध्यापक होते. साहित्य अकादमीचे ते सदस्य होते.

लहानपणापासून बापटांवर राष्ट्र सेवा दलाचे आणि साने गुरुजींच्या सहवासाचे संस्कार झाले. बिजली (१९५२) या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहावर या संस्कारांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. ‘सेतु’ (१९५७), ‘अकरावी दिशा’ (१९६२), ‘सकीना’ (१९७२) आणि ‘मानसी’ (१९७७) हे त्यांचे बिजलीनंतरचे काव्यसंग्रह. बिजली ते मानसीपर्यंत त्यांच्या कवितेचा झालेला प्रवास कवी म्हणून झालेल्या त्यांच्या विकासाचा द्योतक आहे. बिजलीनंतरच्या काव्यसंग्रहांतून त्यांच्या अनुभवांचे क्षेत्रही उत्तरोत्तर अधिकाधिक विस्तारत गेल्याचे दिसते. संस्कृत आणि इंग्रजी कवितेचा प्रभावही या कवितेवर दिसून येतो. सामाजिक विषमता आणि अन्याय यांच्या तीव्र जाणिवेबरोबरच यौवनाचा अभिजात डौल, निसर्गाच्या विभ्रम-विलासांतून खट्याळ शृंगार व्यक्तविण्याची प्रवृत्ती, लावणीसारख्या जुन्या काव्यप्रकाराचे पुनरुज्जीवन करण्याचा रसिक प्रयत्न यांचा प्रत्यय त्यांच्या बिजलीनंतरच्या कवितेत येतो. त्यांच्या कवितेचे परिपक्व रूप मानसीमध्ये विशेषत्वाने जाणवते. या काव्यसंग्रहातील त्यांची कविता मितभाषी, परंतु आशयदृष्ठ्या अधिक गहन अशी आहे.

- Advertisement -

संस्कृतातील अभिजातता आणि नादवती शब्दकळा बंगालीतील-विशेषत: गुरुदेव टागोरांच्या कवितेतील-मानवतावाद आणि इंग्रजी कवितेतील स्वच्छंदतावादी प्रवृत्ती यांचे ठळक संस्कार बापटांच्या कवितेवर झालेले दिसतात. बापटांची अस्सल रसिकता आणि अतिंद्रिय अनुभवांना रूपरसगंधाचे लावण्य प्राप्त करून देणारी त्यांची बहुरंगी प्रतिमासृष्टी हेही त्यांच्या कवितेचे विशेष लक्षणीय पैलू होत.‘बारा गावचे पाणी’ (१९६७) हा बापटांचा प्रवासवर्णनपर ग्रंथ आहे. या ग्रंथात भारताचा निसर्ग, चालीरीती, लोककला, यांचे प्रत्ययकारी चित्रण त्यांनी केले आहे. अशा या श्रेष्ठ कवीचे 17 सप्टेंबर 2002 रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -