घरताज्या घडामोडीWorld Disability Day : अपंगत्त्वावर मात करीत आत्मनिर्भरता ; महाडच्या अरुण आंग्रेंची...

World Disability Day : अपंगत्त्वावर मात करीत आत्मनिर्भरता ; महाडच्या अरुण आंग्रेंची कमाल

Subscribe

दोन्ही पाय अधू म्हणजे पुढील आयुष्यच अधू, अशी भावना कुणाच्याही मनात येईल. पण दोन्ही पायांनी अधू असून देखील पदवी पर्यंतचे शिक्षण घेत गावातच व्यवसाय उभ्या करणार्‍या अरुण शंकर आंग्रे यांनी एक वेगळा आदर्श दिव्यांग तरुणांपुढे उभा केला आहे. तालुक्यातील रेवतळे येथील आंग्रे यांनी शिक्षण घेण्याबरोबर गावात दुकान, पीठ गिरण आणि पहाटे ५ वाजता महाडला येऊन भाजी विक्री अशा कष्टातून मुलांचेही शिक्षण सुरू ठेवले आहे.

एकदा अपंगत्त्व आले की माणूस खचून जातो. त्याला भावी आयुष्याची चिंता सतावते. अनेकदा दिव्यांग व्यक्तींना भिक मागून दिवस काढावे लागत असल्याचे अनेक उदाहरणे पहावयास मिळतात. मात्र मेहनत, काम करण्याची जिद्द आणि डोळ्यासमोर एक ध्येय ठेवून काम केल्यास असे दिवस जगण्याची पाळी येत नाही हे आंग्रे यांनी दाखवून दिले आहे. वयाच्या चौथ्या वर्षी यांचे दोन्ही पाय निकामी झाले. पोलिओमुळे पाय काम करीत नव्हते. मुलाच्या खेळण्याच्या वयातच अशी स्थिती ओढवल्याने आई-वडील चिंतेत पडले. मात्र त्यांनी मुलाला याही अवस्थेत शिक्षण देण्याचा विचार केला. इयत्ता ६ वीपर्यंत गावातील प्राथमिक शाळेत शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणाकरिता बहिणीकडे पुणे येथे पाठविण्यात आले. पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे येथे घेतले. घराला आधार देण्याकरिता काही तरी केले पाहिजे यातून पुणे सोडले आणि पुन्हा गाव गाठले.

- Advertisement -

घरातील लोकांचा विचार घेत या परिसरात दुकान नसल्याने गावात आल्यानंतर दुकान सुरू करण्याचा विचार केला. दोन्ही पायांना कुबड्यांचा आधार असल्याने हे काम करणे शक्य नाही, असा विचार न करता गावात सन २००१ मध्ये दुकान सुरू केले. घरातच एका कोपर्‍याचा आधार घेत थाटलेले दुकान हळूहळू चांगले चालू लागले. एव्हढ्यावर न थांबता ग्रामस्थांची गैरसोय थांबविण्यासाठी उत्पन्नातून पिठाची चक्की सुरू केली. चक्की व्यवसायाचाही चांगला जम बसला. दोन्ही पायांना कुबड्या लावून तासन्तास दुकान आणि चक्की सांभाळण्याचे काम आंग्रे नियमितपणे करीत आहेत.

पावसाळी भात शेती केल्यानंतर शेतातील ओल्या जमिनीत नांगर भाड्याने घेऊन भाजीपाला घेतला जातो. आंग्रे यांनी देखील आपल्या शेतात एक परसबाग तयार करून मुळा, वांगी, माठ, मिरची, अळूची पाने लावली आहेत. सप्टेंबरपासून नोव्हेंबर पर्यंत ओल्या मातीच्या आधारे ही पालेभाजी उत्तमरित्या येते. विशेष म्हणजे ही पालेभाजी पूर्णतः शेणखत आणि गावठी बियाणांची असल्याने शहरात मागणी आहे. कोणत्याच शासकीय निधीची अपेक्षा न करता आंग्रे आपल्या मेहनतीच्या बळावर आपल्या गावातच व्यवसाय उभा करून आपल्या कुटुंबाची गुजराण योग्यरित्या करीत आहेत.

- Advertisement -

विशेष म्हणजे त्यांनी गावाचे उपसरपंचपद देखील योग्यरितीने सांभाळले. सामाजिक भान कायम मनात असल्याने आंग्रे यांनी शाळेसाठी रस्ता, सभामंडप, जिल्हा परिषदेकडून पाणी योजना अशा विविध योजना राबविल्या. जिद्दीच्या बळावर मुलांचे शिक्षण देखील सुरू ठेवले आहे. मुलगा बारावी तर मुलगी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या कोणत्याच शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसल्याचे ते अभिमानाने सांगतात. आंग्रे यांचा आदर्श अन्य दिव्यांग तरुणांना घेण्यासारखा असल्याची प्रतिक्रिया प्राथमिक शिक्षक रवींद्र पाटील यांनी व्यक्त केली.

                                                                                                    वार्ताहर :- निलेश पवार


हे ही वाचा – Pune Water Supply: आजपासून पुणे शहराचा पाणीपुरवठा कमी केला जाणार; महापौर झाले आक्रमक


 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -