कारागृह अधीक्षक फरार झाल्याने नगर उपकारागृहात कैदी रामभरोसे

खुनाच्या गुन्ह्यात जामिन फेटाळताच कारागृह अधीक्षक गायकवाड फरार

अहमदनगर : चिन्या ऊर्फ रवींद्र जगताप याच्या मृत्यूप्रकरणी देण्यात आलेला अंतरीम अटकपूर्व जामिन अर्ज अखेर न्यायालयाने फेटाळला आहे. पेट्रस गायकवाड जळगाव येथे कार्यरत असताना कारागृहात चिन्याचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे, पेट्रस गायकवाड यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल असतानाही त्यांची नगरच्या उपकारागृहात कार्यकारी पदावर नियुक्ती झाली होती. या गुन्ह्यातील जामिन फेटाळताच पेट्रस गायकवाड हे नगरमधून फरार झाले आहेत. अशा स्थितीत नगरच्या उपकारागृहातील कैदी मात्र रामभरोसे असल्याचे विदारक चित्र आहे.

याबाबत समोर आलेली माहिती अशी आहे की, जळगाव शहर पोलीस ठाण्यात मारहाणीच्या एका गुन्ह्यात चिन्या ऊर्फ रवींद्र जगताप याला जळगाव जिल्हा कारागृहात, दि. 11 सप्टेंबर 2020 रोजी कैदी म्हणून दाखल करण्यात आले होते. तेथे दाखल केल्यानंतर चिन्यास जिल्हा कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड, कारागृह अधिकारी जितेंद्र माळी व रक्षकांकडून अमानुष मारहाण झाली होती व त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप मयताची पत्नी मीना जगताप यांनी केला होता. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन अनेकांचे जाबजबाब नोंदविण्यात आले. समोर आलेले पुरावे आणि नोंदविण्यात आलेली साक्ष ही कारागृह अधीक्षकांसह त्यांच्या काही कर्मचार्यांच्या विरोधात होती. त्यावेळी, हे प्रकरण संपूर्ण राज्यात गाजले होते. तसेच सामाजिक माध्यमांमधून त्या विरोधात जोरदार प्रतिक्रियाही उमटल्या होत्या.

दरम्यानच्या काळात, पेट्रस गायकवाड यांना सदर प्रकरणी अंतरीम अटकपूर्व जामिन मिळाला आणि त्यांची बदली अहमदनगरच्या उपकारागृहात झाली. वास्तविक पाहता पेट्रस गायकवाड यांच्या विरोधात 302 नुसार गंभीर गुन्हा दाखल असताना त्यांना कार्यकारी पदावर नियुक्ती देता येत नसतानाही पेट्रस गायकवाड यांनी नगरमध्ये नियुक्ती मिळवली होती.
आता जामिन फेटाळला जाताच पेट्रेस गायकवाड हे नगरमधून फरार झाले आहेत. पेट्रस गायकवाड हे फरार झाल्याने अहमदनगरच्या उप कारागृहासह त्यातील कैद्यांचे काय? हा प्रश्न समोर आला आहे. याबाबत उपकारागृहाच्या प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी या विषयावर अधिक बोलण्यास टाळाटाळ केली.