‘म्हणून तिला मारलं’, शौचास गेलेल्या महिलेचे डोळे निकामी करणाऱ्या आरोपीचा अजब दावा

accused of attacking a women in shirur taluka of pune arrested
पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपीस केली अटक

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील न्हावरे गावात ३ नोव्हेंबर रोजी शौचास गेलेल्या महिलेवर हल्ला झाला होता. या हल्ल्यात महिलेचे दोन्ही डोळे निकामी झाले आहेत. या गुन्ह्यातील आरोपीला अटक व्हावी, यासाठी विरोधकांनी सरकारवर दबाव आणला होता. अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीस अटक केली आहे. आरोपीचे नाव कुंडलीक बगाडे असून तो मुळचा बारामतीमधील उंडवडी गावचा राहणारा आहे.

न्हावरे येथे एक महिला रात्रीच्या वेळेस शौचास गेली असता नराधम आरोपीने तिच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात महिलेच्या दोन्ही डोळ्यांना जबर मार लागल्यानंतर ते निकामी झाले. हल्ल्यानंतर महिलेवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सहा दिवसांनी पोलिसांनी आरोपीला अटक केले. मात्र आरोपी बगाडेने हल्ला केल्याचे विचित्र कारण पोलिसांना दिले. पीडित महिलेने आपल्याला शिवीगाळ केल्याने आपण रागाच्या भरात हल्ला केला, असा अजब दावा आरोपीने केला आहे.

या गुन्ह्याबाबत पोलिसांवर आरोपीस पकडण्यासाठी चांगलाच दबाव आला होता. त्यामुळे पुणे ग्रामीणच्या वरिष्ठ पोलिसांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घातले होते. गुन्हा घडल्यानंतर राजे कॉम्पलेक्स येथील चायनिज सेंटरमध्ये काम करणाऱ्या एका वेटरने दाढी आणि डोक्याचे केस काढलेले आहेत आणि तो कुठेतरी निघून गेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. महिलेने ज्या संशयित आरोपीचे वर्णन केले होते. त्याच्याशी या इसमाचे वर्णन जुळत होते. त्यामुळे पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन संशयित इसमाचा शोध सुरु केला. खबऱ्यांचे नेटवर्क आणि आरोपीच्या वर्णनावरुन अखेर या नराधमास जेरबंद करण्यात आले आहे.