घरदेश-विदेशगोदावरीत बोट उलटून २३ जणांचा मृत्यू, ४ लहान मुलांचा समावेश

गोदावरीत बोट उलटून २३ जणांचा मृत्यू, ४ लहान मुलांचा समावेश

Subscribe

आंध्र प्रदेशमधील गोदावरी नदीत मंगळवारी संध्याकाळी बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत २३ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १४ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असून नऊ मृतदेह अजूनही हाती लागलेले नाहीत. सापडलेल्या मृतदेहांमध्ये ८ महिला, ४ लहान मुलं आणि २ पुरुषांचा समावेश आहे. हैद्राबाद जिल्हा प्रशासन, नौदल आणि एनडीआरएफकडून युद्धपातळीवर शोध मोहीम सुरु आहे. प्रशासनाकडून दोन हेलिकॉप्टरसह अतिरिक्त पाणबुड्यांच्या पथकाकडूनही शोधमोहीम सुरु आहे.

कोंडामोडालू ते राजामुंद्री अशी प्रवाशांना घेऊन जाणारी बोट मंगळवारी अचानक उलटली. या बोटीमधून ५० प्रवासी प्रवास करत होते. संध्याकाळी पाचच्या दरम्यान देविपाटनम ब्लॉकजवळ ही दुर्घटना घडली. या घटनेनंतर बोटीतील दहा प्रवाशांनी पोहत नदी किनारा गाठला. या लोकांनी नदी किनाऱ्यावर आल्यानंतर स्थानिक लोकांना याची माहिती दिली. त्यानंतर स्थानिक नागरिक, जिल्हा प्रशासन, पोलीस आणि एनडीआरएफची टीमने घटनास्थळी धाव घेत मदत कार्याला सुरुवात केली. रात्रभर सुरु असलेल्या बचावकार्यात त्यांना १७ जणांना वाचवण्यात यश आलं. बेपत्ता झालेल्या इतर प्रवाशांची शोध मोहिम सध्या सुरु असून आतापर्यंत १४ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेनंतर बोट मालकाने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं असून या दुर्घटनेसंदर्भात चौकशी सुरु आहे.

- Advertisement -

या दुर्घटनेच्या वेळी वादळ आणि जोरदार पाऊस सुरु होता. त्यामुळे बोटीत असणाऱ्या प्रवाशांनी खिडक्या बंद केल्या. दरम्यान बोट अचानक बुडायला लागली. खिडक्या बंद असल्याने बोटीतील प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. दुर्घटना ज्यावेळी घडली त्यावेळी बोट मालक आणि चालकांनी स्वत:चा जीव वाचवला मात्र प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले नाहीत. जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी नदीमध्ये उड्या टाकल्या. काही प्रवाशांना पोहता येत होते त्यांनी पोहत किनारा गाठला. मात्र इतर प्रवाशांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. या दुर्घटनेसंदर्भात चौकशी केली जाईल, असं नायडू यांनी सांगितलं. दुर्घटनाग्रस्त बोटीमध्ये सिमेंटची पोती ठेवण्यात आल्याने बोटीत अतिरिक्त भार झाला. बोटीत किती सिमेंटची पोती होती याचा शोध सुरु असल्याचे नायडू यांनी सांगितले. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून दहा लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच मृतांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्यात येईल. तसंच मृत्यू पावलेल्या प्रवाशांच्या मुलांची शिक्षणाची जबाबदारी सरकार घेणार असल्याचेही नायडू यांनी सांगितलं.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -