घरदेश-विदेशपहिल्याच वादळात उज्जैनच्या प्रकल्पाचे 850 कोटी गेले पाण्यात, काँग्रेसकडून चौकशीची मागणी

पहिल्याच वादळात उज्जैनच्या प्रकल्पाचे 850 कोटी गेले पाण्यात, काँग्रेसकडून चौकशीची मागणी

Subscribe

काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उज्जैनमधील 'श्री महाकाल लोक' कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले होते. 850 कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला हा प्रकल्प मात्र पहिल्याच वादळात पाण्यात गेल्याचे रविवारी पाहायला मिळाले.

मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यात रविवारी (ता. 28 मे) आलेल्या जोरदार वादळाने कहर केला. यामुळे जिल्ह्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. या वादळामुळे ‘श्री महाकाल लोक’ कॉरिडॉरमध्ये स्थापित सातपैकी सहा सप्तऋषींच्या मूर्तींचीही मोडतोड झाल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय या वादळामुळे घरांचीही पडझड झाल्याची सांगण्यात आले आहे.

हेही वाचा – पुतिन यांच्या भेटीनंतर बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांची प्रकृती बिघडली, विषबाधा झाल्याचा संशय

- Advertisement -

याबाबत माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, उज्जैन येथील प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिरातील ‘श्री महाकाल लोक’ कॉरिडॉरमधील सहा सप्तऋषींच्या मूर्तींचे रविवारी दुपारी आलेल्या वादळामुळे कोसळून नुकसान झाले आहे. मूर्ती पडली तेव्हा कॉरिडॉरमध्ये अनेक भाविक उपस्थित होते, मात्र सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. तर या मूर्तींचे आणि कॉरिडॉरचे काम गुजरातमधील कंपन्यांनी केली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 ऑक्टोबर 2022 मध्ये 900 मीटर लांबीच्या ‘श्री महाकाल लोक’ कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले होते. एकूण 856 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 351 कोटी रुपये खर्चून ‘श्री महाकाल लोक’ बांधण्यात आला आहे. देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले महाकालेश्वराचे मंदिर उज्जैन येथे आहे. येथे देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक येतात.

- Advertisement -

कंत्राटदारांकडून नवीन मूर्ती बसवण्यात येतील
या घटनेनंतर उज्जैनचे डीएम कुमार पुरुषोत्तम यांनी सांगितले की, “श्री महाकाल लोक कॉरिडॉरमध्ये 160 मूर्ती आहेत, त्यापैकी रविवारी दुपारी आलेल्या जोरदार वादळामुळे सहा मूर्ती पडल्या आणि तुटल्या.” या तुटलेल्या मूर्ती तेथे स्थापित केलेल्या सात सप्त ऋषींच्या असून त्या सुमारे 10 फूट उंच होत्या. कंत्राटदार नवीन मूर्ती बसवतील, कारण या मुर्तींची पुढील पाच वर्षे देखभाल करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. तर, “या पडलेल्या आणि तुटलेल्या मूर्ती महाकाल मंदिराच्या आतल्या नव्हत्या. त्या ‘श्री महाकाल लोक’ कॉरिडॉरमध्ये बसवण्यात आलेल्या मूर्त्या होत्या, असे स्पष्टीकरण देखील त्यांनी दिले आहे.

तर आता या प्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी चौकशीची मागणी केली आहे. तर या प्रकरणात जे कंत्राटदार दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. कमलनाथ यांनी याबाबतचे ट्वीट देखील केले आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, “आज महाकाल लोक कॉरिडॉरमध्ये वादळामुळे ज्या प्रकारे मूर्ती जमिनीवर पडल्या, ते दृश्य कोणत्याही धार्मिक व्यक्तीसाठी अत्यंत दयनीय आहे. महाकाल लोकात ज्या मूर्ती पडल्या आहेत, नवीन मूर्ती तात्काळ बसवाव्यात आणि निकृष्ट बांधकाम करणाऱ्यांची चौकशी करून त्यांना शिक्षा करावी, अशी माझी मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे.”

तसेच, ज्यावेळी मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता होती, त्यावेळी सरकारने उज्जैनमध्ये महाकाल मंदिर परिसराचे भव्य बांधकाम करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यानंतर मध्य प्रदेशात भाजपचे सरकार आले. पण आम्हाला याबाबत कल्पना नव्हती की ते या कामात या प्रकारची अनियमितता दाखवतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -