रशियाच्या विमानाने अमेरिकेच्या ड्रोनला काळ्या समुद्रात पाडले? दोन्ही देशांत तणाव

fighter jet

काळ्या समुद्रावर (Black Sea) रशियन एसयू-27 जेट विमान आणि अमेरिकेचा लष्करी ड्रोन MQ-9 यांची धडक झाली आहे. या धडकेमुळे अमेरिकेचे लष्करी ड्रोन काळ्या समुद्रात कोसळले. रशियाने जाणीवपूर्वक ही धडक घडवून आणली असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. या घटनेचा निषेध व्यक्त करत अमेरिकेने वॉशिंग्टनमधील रशियन राजदूताला बोलावून इशारा दिला.

या भागातील अमेरिकन हवाई दलाचे जनरल जेम्स हेकर म्हणाले, “आमचे एमक्यू-9 ड्रोन आंतरराष्ट्रीय हवाई क्षेत्रात नियमित मोहिमेवर होते, तेव्हा रशियन विमानाची टक्कर झाली. या धडकेमुळे MQ-9 क्रॅश होऊन पूर्णपणे नुकसान झाले. खरे तर ही रशियाची असुरक्षित आणि अव्यावसायिक कृती आहे.”

अमेरिकेचा ड्रोन पाडला असल्याचा दावा रशियाने फेटाळून लावला आहे. परंतु, रशियाने ड्रोनवर आधी इंधन फेकले आणि त्यानंतर त्याचे नुकसान केले. त्यामुळे ड्रोन खाली कोसळला, असा आरोप अमेरिकेकडून करण्यात येतोय. नाटोचे युरोपमधील सर्वोच्च कमांडर आणि अमेरिकन जनरल क्रिस्टोफर कॅवोली यांनी संघटनेच्या सदस्य देशांना या घटनेची माहिती दिली आहे. व्हाईट हाऊस आणि पेंटागॉनने या घटनेचा निषेध केला असून तणाव वाढण्याचा इशारा दिला आहे. त्याच वेळी, रशियन संरक्षण मंत्रालयाचे म्हणणे आहे की अमेरिकन ड्रोन रशियन सीमेजवळ उड्डाण करत होते आणि त्यांच्या विमानात शस्त्रे वापरली जात नाहीत. तसंच, रशियाचं विमान अमेरिकन ड्रोनच्या संपर्कात आलेच नव्हते असा दावाही रशियाकडून केला जातोय.

अमेरिकन ड्रोन त्यांच्या तांत्रिक बिघाडामुळे कोसळले. तसंच, अमेरिकेच्या ड्रोनचे नुकसान झाल्याचा दावाही रशियाने फेटाळला आहे. रशियाची दोन्ही विमाने एअरफिल्डवर सुरक्षितपणे पोहोचली आहेत, असंही रशियाने स्पष्ट केलं आहे.