२१ दिवसांचा लॉकडाऊन, नागरिकांच्या दुकानाबाहेर रांगा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाचा वाढता धोका बघून संपूर्ण देशात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. त्याबरोबरच नागरिकांनी घऱाबाहेर पडू नये व घरात राहून स्वत;बरोबरच कुटुंबही सुरक्षित ठेवावे असे देशवासियांना आवाहन केले. मात्र २१ दिवस सगळच बंद राहणार असल्याचे ऐकून नागरिकांनी पुन्हा धावाधाव करण्यास सुरुवात केली आहे. किराणा सामानाचे दुकान , मेडिकल, पेट्रॉल पंप यांच्याबाहेर गर्दी उसळली असून जी गर्दी टाळण्याचे आवाहन मोदींनी केले त्यालाच हरताळ फासल्याचे चित्र मुंबईत अनेक ठिकाणी बघायला मिळत आहे.

बोरिवली पश्चिमेकडील दुकानाबाहेर नागरिकांनी गर्दी केली असून गर्दी हटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांबरोबरही  नागरिकांची बाचाबाची झाल्याचे वृत्त आहे. त्यातच उद्या गुढीपाडवा असल्याने नागरिकांनी फुले घेण्यासाठी बोरिवली स्टेशनजवळील मार्केटमध्ये धाव घेतली . पण तेथेही सगळे बंद असल्याने व पोलिसांनी हुसकावल्याने अनेकजणांना हात हलवत परत यावे लागले. हेच दृश्य ना म जोशी मार्ग व अनेक ठिकाणी बघायला मिळाले.