…तर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करू – अमित शहा

Amit shah

काश्मिरातील नागरिकांच्या हत्येसाठी दहशतवाद्यांना मदत करणे थांबवले नाहीतर सर्जिकल स्ट्राईक करू, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पाकिस्तानला दिला आहे. जर तुम्ही सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले किंवा काश्मीरमधील आमच्या नागरिकांना मारण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आणखी सर्जिकल स्ट्राईक करू. आमच्यावर कोणीही हल्ले केलेले आम्ही खपवून घेत नाही हे यापूर्वीही भारताने सर्जिकल स्ट्राईक करून सिद्ध केले असल्याचेही ते म्हणाले.

गोव्याच्या धारबंदोरा येथील राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाच्या पायाभरणी समारंभात अमित शहा बोलत होते. ते म्हणाले की, भारताच्या सीमांवरील शांतता कोणीही भंग करू शकत नाही, हाच संदेश आम्ही या या सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून दिला होता. दोन्ही देशादरम्यान चर्चेची एक वेळ होती. मात्र, ती वेळ राहिली नसून आता जशात तसे उत्तर देण्याची वेळ आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्त्वाखाली झालेला सर्जिकल स्ट्राईक हे महत्त्वाचे पाऊल होते. त्यातून आम्ही संदेश दिला की कोणीही भारताच्या सीमा असुरक्षित करू शकत नाही. मात्र, कोणी तसा प्रयत्न केला तर आम्ही त्याला चोख प्रत्युत्तर देऊ, असेही अमित शहा म्हणाले.