घरदेश-विदेशFarmer Protest : बळीराजाचा निर्वाणीचा इशारा; ८ डिसेंबरला 'भारत बंद'!

Farmer Protest : बळीराजाचा निर्वाणीचा इशारा; ८ डिसेंबरला ‘भारत बंद’!

Subscribe

राजधानी दिल्लीच्या सीमांवर गेल्या काही दिवसांपासून बळीराजानं धडका मारायला सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने नुकतेच पारित केलेले ३ कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी अभूतपूर्व असं आंदोलन छेडलं असून दिल्लीच्या सीमांवर हे शेतकरी आता तळ ठोकून आहेत. मात्र, केंद्र सरकारकडून या शेतकऱ्यांना दिलासा देणारा कोणताही निर्णय घेतला जात नसल्यामुळे अखेर या शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. येत्या ८ डिसेंबर रोजी या शेतकऱ्यांनी देशव्यापी भारत बंदची घोषणा केली आहे. या आंदोलनाला काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, टीआरएस, राष्ट्रवादी काँग्रेस अशा राजकीय पक्षांसोबतच तब्बल ५१ वाहतूक संघटना आणि देशभरातील अनेक सेलिब्रिटीजनी देखील पाठिंबा दिला आहे,. त्यामुळे हे आंदोलन देशव्यापी होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात आज शिरोमणी अकाली दलाचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला आलं होतं. यावेळी, ‘शेतकरी आंदोलनाला आमचा पाठिंबा असून मी स्वत: दोन आठवड्यांत होणाऱ्या बैठकीसाठी दिल्लीला उपस्थित राहीन’, असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी या शेतकऱ्यांना दिलं आहे. यासोबतच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि टीआरएस या पक्षांनी देखील आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. ‘केंद्र सरकारने अजूनही शहाणपणाची भूमिका घ्यावी अन्यथा हे आंदोलन दिल्लीपुरतं सीमित राहणार नाही’, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. त्यामुळे भाजपविरोधी पक्षांची या आंदोलनादरम्यान एकजूट होताना दिसत आहे.

केंद्र सरकारने चर्चेविना नवा कृषी कायदा अंमलात आणत शेतकऱ्यांवर जाचक असणाऱ्या तरतुदी लादल्या आहेत. शेतकरी संघटनांशी याबाबत केंद्र सरकारच्या झालेल्या चर्चेच्या फेऱ्या अपयशी ठरल्या. त्यामुळे या कायद्याविरोधात शेतकरी आंदोलनाची धार तीव्र करण्यासाठी देशभरातील शेतकरी संघटनांनी ८ डिसेंबर रोजी राष्ट्रव्यापी ‘भारत बंद’ पुकारला आहे. या ‘भारत बंद’ला महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णपणे समर्थन देत आहे. सर्व कार्यकर्त्यांनी शांतपणे तसेच कोविडकाळातील मर्यादांचे पालन करून या ‘भारत बंद’मध्ये सहभागी व्हावे व या कायद्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करावा.

जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

दुसरीकडे देशभरातील सामाजिक संघटना, कर्मचारी संघटना आणि सामान्य जनतेमधून या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळू लागला आहे. सोशल मीडियावर देखील आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्रेंड पाहायला मिळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता केंद्रात सत्तेत असलेलं एनडीएचं सरकार आणि या सरकारचं नेतृत्व करणारा भाजप आणि या सगळ्यांच्या दोऱ्या हातात असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर नेमकी काय भूमिका घेतात? याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. त्यात ८ डिसेंबरला शेतकऱ्यांनी पुकारलेला भारत बंद किती यशस्वी होतो? यावरही बरंच काही अवलंबून असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -