बॉक्सिंग कोचने केला विद्यार्थीनीचा विनयभंग

Boxing coach arrested for sexually assaulting 19 year old student
छायाचित्र इंटरनेटवरुन साभार

पश्चिम बंगाल येथे बॉक्सिंग स्पर्धेला जात असताना एका बॉक्सिंग कोचने त्यांच्या टीममधील १९ वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग केला होता. त्यानंतर आता आरोपी २८ वर्षीय कोचला अटक करण्यात आली आहे. पीडित तरुणी ही हरियाणाचे प्रतिनिधित्व करत होती. शुक्रवारी या तरुणीने आरोपीची तक्रार केल्यानंतर प्रशिक्षकाला अटक करण्यात आली आहे.

२७ फेब्रुवारी रोजी संबंधित आरोपी आणि पीडिता दिल्ली रेल्वे स्थानकावरुन कोलकाताला जाण्यासाठी निघाले होते. त्यांच्यासोबत टीममधील इतरही सदस्य प्रवास करत होते. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार या प्रशिक्षकाने प्रवासात तिचा विनयभंग केला असल्याचे म्हटले आहे. तसेच कोलकाता इथे पोहोचल्यानंतर मुक्कामाच्या वेळी देखील प्रशिक्षकाने विनयभंग केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या तक्रारीनंतर नवी दिल्ली रेल्वे स्थानक पोलिसांनी संबंधित कलम लावून गुन्हा दाखल केला आहे. हरियाणामधील सोनीपत येथून प्रशिक्षकाला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत प्रशिक्षकाने आपला गुन्हा मान्य केला आहे. आरोपी प्रशिक्षक हा सोनीपत येथे बॉक्सिंग अॅकेडमी चालवत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.