Assembly Election 2022 : यूपीमध्ये भाजपला मोठा धक्का, कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्यांचा सपामध्ये प्रवेश

पाच राज्यांच्या विधानसभेच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. परंतु उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशातील कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे दिला आहे. त्याचसोबतच त्यांनी भाजपा पक्षातून समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावरच आता भाजपला मोठा धक्का बसला आहे.

राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना स्वामी प्रसाद मौर्यांनी राजीनामा दिला आहे. मौर्य म्हणाले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातील कामगार, रोजगार आणि समन्वय मंत्री या नात्याने प्रतिकूल परिस्थितीत तसेच विचारसरणीत राहूनही मी अत्यंत निष्ठेने जबाबदारी पाडली आहे. परंतु दलित, मागासवर्गीय, शेतकरी, बेरोजगार तरुण, लघू आणि मध्यम व्यापारी यांच्याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे मी उत्तर प्रदेशच्या योगी मंत्रिमंडळातून राजीनामा देत आहे. अशा प्रकारचं ट्विट मौर्य यांनी केलं आहे.

स्वामी प्रसाद मौर्य यांनी कॅबिनेट पदाचा राजीनामा दिल्यानंतर समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ट्विट करत एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत अखिलेश यादव यांनी लिहिलंय की, सामाजिक न्याय आणि समता-समानतेसाठी लढणारे लोकप्रिय नेते स्वामी प्रसाद मौर्य आणि त्यांच्यासोबत आलेले इतर सर्व नेते, कार्यकर्त्यांचं त्यांनी सपामध्ये प्रवेश केल्यामुळे हार्दिक स्वागत केलं आहे.

मागील काही दिवसांपासून स्वामी प्रसाद मौर्य भाजपची साथ सोडणार असल्याची चर्चा जोरदार रंगू लागली होती. त्याप्रमाणे निवडणुकीच्या तोंडावरच मौर्यांनी भाजपला झटका देत अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे आता मौर्य सुद्धा अखिलेश यादव यांच्या सायकलवरून प्रवास करणार आहेत. या धक्क्यानंतर भाजपची पुढची रणनिती काय असणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.


हेही वाचा : IND vs SA मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेच्या ऑलराऊंडरचा संन्यास, IPL चा सर्वात महागडा खेळाडू