Raipur Helicopter Crash : रायपूर विमानतळावर हेलिकॉप्टरचा अपघात, दोन वैमानिकांचा मृत्यू

Chhattisgarh state helicopter crashed at Raipur airport 2 pilot died
Raipur Helicopter Crash : रायपूर विमानतळावर हेलिकॉप्टरचा अपघात, दोन वैमानिकांचा मृत्यू

छत्तीसगडमधील रायपूरच्या स्वामी विवेकानंद विमानतळावर गुरुवारी रात्री शासकीय हेलिकॉप्टर अगस्त वैस्टलँड क्रॅश झाले. विमानतळावर झालेल्या हेलिकॉप्टर अपघातामध्ये २ वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. लँडिंग करताना हेलिकॉप्टरचे पंखे जमिनीवर टेकले यामुळे हेलिकॉप्टरचा समतोल बिघडला. खाली पडल्यावर हेलिकॉप्टरचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच बचावकार्य करण्यासाठी पथक घटनास्थळी दाखल झाले होते. रात्रभर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु होते.

विमानतळावर हेलिकॉप्टर अपघात झाला असल्यामुळे नियमित उड्डाणावर कोणताही परिणाम होणार नाही. सर्व उड्डाणे सामान्य असतील असे विमानतळ संचालकांनी सांगितले आहे. राज्य सरकारचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. रायपूर विमानतळावर रात्री ९.१० वाजता हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे उच्च अधिकारी विमानतळावर पोहोचले. तेथे त्यांनी विमानतळाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत अपघाताच्या कारणाची माहिती घेतली.

रायपूरचे एसएसपी प्रशांत अग्रवाल यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरचे दोन पायलट कॅप्टन गोपाल कृष्ण पांडा आणि कॅप्टन एपी श्रीवास्तव हे उड्डाणाचा सराव करत होते. यावेळी अचानक हा अपघात झाला. या अपघातात दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला. कॅप्टन पांडा मूळचा ओडिशाचा आहे. गेल्या काही वर्षांपासून ते राज्य सरकारमध्ये वरिष्ठ पायलट म्हणून कार्यरत होते. कॅप्टन श्रीवास्तव हे दिल्लीचे रहिवासी होते. बचाव पथकाने दोघांनाही ढिगाऱ्यातून बाहेर काढले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र गंभीर जखमी झालेल्या दोन्ही कॅप्टनना रुग्णालयात आणले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.

CM भूपेश बघेल यांच्याकडून शोक व्यक्त

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी अपघाताची माहिती मिळाल्यानंतर शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, रायपूर विमानतळावर राज्य हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची दुःखद माहिती मिळाली. या दुःखद अपघातात आमचे दोन्ही पायलट कॅप्टन पांडा आणि कॅप्टन श्रीवास्तव यांचे दुःखद निधन झाले आहे. या दुःखाच्या प्रसंगी देव त्यांच्या कुटुंबीयांना शक्ती देवो आणि त्यांच्या आत्म्याला शांती देवो. असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.


हेही वाचा : उत्तर प्रदेशातील मदरशांमध्ये राष्ट्रगीत गाणे अनिवार्य