राष्ट्रपती निवडणूक : राष्ट्रपती, पंतप्रधानांसह मान्यवरांनी द्रौपदी मुर्मूंचे केले अभिनंदन

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या द्रौपदी मुर्मू यांनी ५० टक्क्यांहून अधिक मतांनी विजय मिळविला. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला. त्यांच्या या विजयाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

ज्यावेळी १.३ अब्ज भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहेत, त्यावेळी भारताच्या पूर्वेकडील दुर्गम भागात जन्मलेल्या एका आदिवासी समाजातील भारताच्या कन्येला आपली राष्ट्रपती म्हणून निवडून दिले आहे, असे सांगत पंतप्रधानांनी द्रौपदी मुर्मू यांचे अभिनंदन केले आहे. तसेच, ज्या खासदार आणि आमदारांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला, त्यांचेही पंतप्रधानांनी आभार मानले.

अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत द्रोपदी मुर्मू या सर्वोच्च पदावर पोहोचल्या आहेत. एवढ्या संघर्षानंतर सुद्धा त्यांनी नि:स्वार्थपणे स्वत:ला देश तसेच समाजाच्या सेवेसाठी समर्पित केले आहे. हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. द्रौपदी मुर्मू या आता देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान होत आहेत. यावरून भाजपा सरकार प्रत्येक वर्गाच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे, हेच सूचित होते. हा सुवर्ण क्षण आहे, असे सांगत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मुर्मू यांचे अभिनंदन केले आहे.

तर, गावागावांतील गरीब आणि वंचितांच्या कल्याणासाठी काम करण्यात सक्रिय असलेल्या द्रौपदी मुर्मू या सर्वोच्च संवैधानिक पदापर्यंत पोहोचल्या आहेत. हे भारतातील सशक्त लोकशाहीचे प्रतीक आहे, असे ट्वीट संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे.

यशवंत सिन्हांकडून शुभेच्छा
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मिळविलेल्या विजयाबद्दल द्रौपदी मुर्मू यांना मन:पूर्वक शुभेच्छा देतो. भारताच्या १५व्या राष्ट्रपती म्हणून तुम्ही निडरपणे आणि निष्पक्षपणाने राज्यघटनेच्या रक्षक म्हणून कार्य कराल, अशी अपेक्षा आहे, असे या निवडणुकीतील पराभूत उमेदवार यशवंत सिन्हा यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी देखील द्रौपदी मुर्मू यांचे अभिनंदन केले आहे.

एकनाथ शिंदे यांचे ट्वीट
द्रौपदी मुर्मू यांचे अभिनंदन करणारे ट्वीट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. भारतीय प्रजासत्ताकच्या १५व्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे हार्दिक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीकरिता मनःपूर्वक शुभेच्छा, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.