घरताज्या घडामोडीमिलिंद देवरांकडून गुजरातच्या CM चे कौतुक, ट्विटमुळे चर्चांना उधाण

मिलिंद देवरांकडून गुजरातच्या CM चे कौतुक, ट्विटमुळे चर्चांना उधाण

Subscribe

गेली अनेक वर्षे कॉंग्रेसमध्ये नाराज असलेले माजी केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरच आज बुधवारी भाजपप्रवेश केला. कॉंग्रेसला उत्तर प्रदेशातला हा एक मोठा राजकीय झटका म्हणून आता चर्चा सुरू झाली आहे. त्यातच आता मिलिंद देवरा यांच्या गुजरात सरकारच्या कामगिरीवरील कौतुकामुळे एका नव्या चर्चेला उधाण आले आहे. गुजरात सरकारच्या कामाचे इतर राज्यांनी अनुकरण करण्याची मागणी केल्यामुळेच त्यांच्या या ट्विटने कॉंग्रेसची चिंता वाढवली आहे. सचिन पायलट आणि मिलिंद देवरा या तरूण नेतृत्वाच्या नाराजीमुळे अनेकदा राजकारण तापत असते. त्यामुळे जितीन प्रसाद यांच्या भाजप प्रवेशापाठोपाठच मिलिंद देवराच्या ट्विटमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. गुजरातच्या मॉडेलचे अनुकरण हे इतर राज्यांनी करावे असा सल्ला मिलिंद देवरा यांनी आपल्या ट्विटमधून दिला आहे.

काय आहे गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचे ट्विट ?

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी एक ट्विट करतानाच म्हटले आहे की, मालमत्ता कर, हॉटेल, रिसॉर्ट, रेस्टॉरंटसाठी विजेच्या बिलातील स्थिर आकार माफ करण्याचा निर्णय हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. एक संपुर्ण वर्षभराच्या कालावधीसाठी म्हणजे १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ पर्यंत ही सवलत असेल असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

मिलिंद देवरांकडून गुजरातच्या सीएमचे कौतुक

कॉंग्रेस नेता मिलिंद देवरा यांनी ट्विट करत म्हटले आहे की, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी अतिशय योग्य आणि समजूतदारीचा असा निर्णय घेतला आहे. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी ही इतर राज्यांनीही करायला हवी असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. भारतात हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात तसेच नोकऱ्यांमध्ये होणारे नुकसान टाळण्यासाठी सर्वच राज्यांनी पुढे यायला हवे, असेही आवाहन त्यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून केले आहे.

- Advertisement -

मिलिंद देवरा यांनी आपले जुने सहकारी राहिलेल्या जितिन प्रसाद यांच्या भाजपप्रवेशाच्या निमित्तानेही एक विधान केले आहे. मिलिंद देवरा आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, कॉंग्रेसने आपल्या जून्या स्थितीत येण्याची गरज आहे. त्यामुळेच कॉंग्रेस पक्षातील सक्षम नेतृत्वाकडे सूत्रे देऊन चांगल्या निकालाची स्थिती कॉंग्रेसमध्येही येऊ शकते असेही त्यांनी म्हटले आहे.

कॉंग्रेस नेत्यांमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया, मिलिंद देवरा, जितिन प्रसाद, सचिन पायलट हे कॉंग्रेसच्या युवा ब्रिगेडचे नेते मानले जातात. सिंधिया याआधीही भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता. तर जितिन प्रसाद यांनी अखेर भाजपमध्ये आज प्रवेश केला आहे. पण आज मिलिंद देवरा यांच्या ट्विटमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -