दिल्ली महापालिका ‘आप’च्या हाती; भाजपच्या 15 वर्षांच्या सत्ता परंपरेला खिंडार

delhi mcd results 2022 aam aadmi party wins delhi municipal corporation election bjp on second win

दिल्ली महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. (Delhi MCD Election Results 2022) यामुळे दिल्ली महापालिकेवरील भाजपची 15 वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत आप भाजप आणि काँग्रेसमध्ये मुख्य लढत पाहायला मिळाली. यात भाजप आणि आपमध्ये कडवा संघर्ष पाहायला मिळाला. मात्र काँग्रेसला दोन आकडे गाठण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागली.

दिल्ली महापालिकेच्या 250 जागांसाठी 4 डिसेंबर रोजी मतदान पार पडले. तर आज (7 डिसेंबर ) मतमोजणी पार पडली. या निवडणुकीसाठी 250 जागांसाठी एकूण 1349 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. दिल्ली महापालिकेवरील गेल्या 15 वर्षांपासूनची भाजपची एकहाती सत्ता होती. मात्र यंदा भाजपला धुळ चारत आपला सत्ता काबीज करण्यात यश आलं आहे.

दिल्ली महापालिकेचा 250 जागांचा निकाल आज दुपारी जाहीर झाला. या निकालानुसार आपला 250 पैकी 134 जागांवर यश मिळाले. तर भाजप 104 जागांवर विजयी झाली आहे. याशिवाय काँग्रेसला केवळ 9 जागांवर विजय मिळवता आला आहे. तर 3 जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे दिल्ली महापालिकेवर आता आपला एकहाती सत्ता मिळाली आहे.

भाजपचे पसमांदा कार्ड फेल

भाजपने या निवडणुकीत पसमांदा कार्ड खेळत 4 पसमांदा मुस्लिमांना उमेदवारी दिली होती. यात तीन महिला उमेदवार होत्या, मात्र यापैकी एकही उमेदवार या निवडणुकीत जिंकून येऊ शकला नाही. पसमांदा मुस्लीम समाज हा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या मागास समजला जातो. यात अन्सारी, कुरेशी, मन्सुरी, सिद्दीकी अशा 41 जातींचा समावेश आहे. दरम्यान 2017 मध्ये भाजपाने तत्कालीन 270 पैकी 181 जागांवर विजय मिळवला होता. तेव्हा आपला केवळ 48 जागांवर आणि काँग्रेसला 30 जागांवर विजय मिळवता आला होता. मात्र यंदा आपने दिल्ली महापालिका निवडणुकीत तरी चांगलीच मुसंडी मारली आहे.


महाराष्ट्राच्या गाड्यांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती