Delhi Riot Case : दिल्ली दंगल प्रकरणात पहिली शिक्षा, हिंसाचाराप्रकरणी आरोपीला ५ वर्षाचा तुरूंगवास

दिल्लीत फेब्रुवारी २०२० मध्ये झालेल्या दंगली प्रकरणी न्यायालयाने आज गुरूवारी पहिली शिक्षा सुनावली आहे. जाळपोळ आणि दरोडा प्रकरणी पहिल्या दोषीला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिल्लीच्या कर्करडूमा न्यायालयाने दिनेश यादव नावाच्या व्यक्तीला पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. पक्षकारांची बाजू मांडणारे अधिवक्ता आरसीएस भदौरिया यांनी याबाबत माहिती जारी केली आहे.

न्यायालयाकडून पाच वर्षांची शिक्षा

दिल्लीच्या गोकलपुरी येथील भागीरथी विहारमध्ये मनोरी या ७० वर्षीय महिलेच्या घरात दरोडा आणि आग लावल्याप्रकरणी स्थानिक रहिवासी असलेल्या यादवला न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. पाच वर्षांच्या तुरूंगवासासह १२ हजार रूपये दंडही ठोठावण्यात आला आहे. ८ जून २०२० रोजी दिनेश यादवला अटक करण्यात आली होती.

दिनेश यादव हा मुख्य आरोपी

२५ फेब्रुवारी २०२० रोजी मनोरी नावाच्या महिलेच्या घरात तोडफोड करण्यात आली होती. तसेच आगही लावण्यात आली होती. हिसांचार करणाऱ्या प्रकरणात दिनेश यादव हा मुख्य आरोपी होता. मनोरी यांचे कुटुंबिय नसताना जवळपास १५० ते २०० लोकांनी घरावर हल्ला केला होता, असा आरोप त्यांनी केलाय. दंगलीनंतर संपूर्ण कुटुंब दोन आठवड्यांसाठी दिल्लीतून बाहेरगावी गेले होते, असं देखील त्या म्हणाल्या.

दरम्यान, या प्रकरणी दोन पोलीस अधिकाऱ्यांनी साक्ष दिलेली आहे. त्यानुसार, हिंसाचार प्रकरणात दिनेश हा मुख्य आरोपी होता. परंतु दिनेशला मनोरी यांचं घर जाळताना पाहिलं नव्हतं. जर कोणीही बेकायदेशीर जमावाचा भाग असेल तर तो इतर हिंसाचारालाही तितकाच जबाबदार आहे, असं न्यायालयाने म्हटलं आहे.


हेही वाचा : BMC : मुंबईत अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईसाठी महापालिकेचे मनुष्यबळ तुटपुंजे