कर्नाटकमध्ये सरकार स्थापनेवर चर्चा करण्यासाठी डी.के.शिवकुमार आज दिल्लीला पोहचणार

डी.के. शिवकुमार यांचे बंधू खासदार डी.के. सुरेश यांनी सोमवारी रात्री सांगितले आहे, की शिवकुमार हे मंगळवारी दिल्लीला जाणार आहेत. सरकार स्थापनेसाठी ते काँग्रेस श्रेष्ठींसोबत चर्चा करणार आहेत.

नवी दिल्ली/बंगळुरु – कर्नाटक काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार (D K Shivakumar) हे आज दिल्लीत पोहचणार आहेत. कर्नाटकात सत्ता स्थापनेचा आणि मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा करण्यासाठी शिवकुमार हे मंगळवारी दिल्लीत येणार आहेत. शिवकुमार यांचे बंधू खासदार डी. के. सुरेश यांनी ही माहिती दिली आहे.

कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी मोठ्या प्रमाणात लॉबिंग सुरु झाले आहे. काँग्रेस नेतृत्वाने शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामैय्या (Siddaramaiah) यांना सोमवारीच दिल्लीत बोलावले होते. सिद्धरामैय्या सोमवारी दुपारी दिल्लीत पोहचले. शिवकुमार यांचा सोमवारी ६०वा वाढदिवस होता. त्यातच त्यांना पोटदुखीचा त्रास सुरु झाल्यामुळे ते सोमवारी दिल्लीला जाऊ शकले नाही. सोमवारी सायंकाळी बंगळुरु ग्रामीण लोकसभा मतदारसंघातील खासदार डी.के.सुरेश म्हणाले, ‘ते उद्या दिल्लीला जाणार आहेत.’

दिल्लीला रवाना होण्यापूर्वी डी.के. शिवकुमार म्हणाले, माझ्याकडे एकही आमदार नाही. मी बंडखोरी करत नाही, की ब्लॅकमेलिंग. माझ्यावर जे काम सोपवले गेले

कर्नाटक विधानसभेत २२४ पैकी १३५ जागा जिंकत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. आता काँग्रेस समोर आव्हान आहे ते मुख्यमंत्री कोणाला करायचे याचे. निवडणुकीत मोठे यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार, याचा पेच निर्माण झाला आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामैय्या हे देखील उत्सूक आहेत. तर काँग्रेसला राज्यात मिळालेल्या यशात शिवकुमार यांचा सिंहाचा वाटा मानला जात आहे. सिद्धरामैय्या आणि शिवकुमार या दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. काँग्रेस श्रेष्ठींनी दोन्ही गटांच्या आमदारांना सोमवारी दिल्लीत बोलावले होते. सिद्धरामैय्या पोहचले मात्र शिवकुमार आले नव्हते.

शिवकुमार यांनी निकालानंतर म्हटले होते, की कर्नाटकमध्ये काँग्रेसला मिळालेला विजय हा कर्नाटक जनतेचा विजय आहे. पक्षाने माझ्यावर सोपवलेले काम मी प्रामाणिकपणे केले आहे.

रविवारी रात्री झालेल्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत सिद्धरामैय्या यांनी मुख्यमंत्री निवडीचे सर्वाधिकार हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना देण्याचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला शिवकुमार यांच्यासह सर्व आमदारांनी एकमुखी संमती दिली. अशीही चर्चा आहे, की राज्य मंत्रिमंडळात दोन मुख्यमंत्री असतील.

हेही वाचा : कोण होणार कर्नाटकचा मुख्यमंत्री? सिद्धरमय्यांच्या वक्तव्याने हायकमांड चिंतेत

मुख्यमंत्रीपदाची घोषणा आज संध्याकाळपर्यंत
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी सोमवारी सायंकाळी बैठक झाली. कर्नाटक प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी मिटींग संपल्यानंतर माध्यमांना सांगितले की, खर्गे त्यांचा अहवाल सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे चर्चेसाठी घेऊन जातील. वरिष्ठ नेत्यांसोबत मुख्यमंत्रीपदावर चर्चा होईल. यानंतर मंगळवारी सायंकाळपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे.

ते म्हणाले, खर्गे हे सिद्धरामैय्या, डीके शिवकुमार आणि कर्नाटकच्या इतर नेत्यांसोबतही चर्चा करणार आहेत. त्यासाठीच पक्षश्रेष्ठींनी त्यांना दिल्लीला बोलावले आहे.