घरताज्या घडामोडी'नमस्ते', डोनाल्ड ट्रम्प यांना भारतीयांच्या 'या' गोष्टींचं कौतुक!

‘नमस्ते’, डोनाल्ड ट्रम्प यांना भारतीयांच्या ‘या’ गोष्टींचं कौतुक!

Subscribe

दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अहमदाबादमध्ये उतरल्यानंतर साबरमती आश्रमाला भेट देऊन आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी थेट मोटेरा स्टेडियम गाठलं, जिथे हजारोंच्या संख्येनं भारतीय त्यांची प्रतिक्षा करत होते. या स्टेडियमवर केलेल्या भाषणामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या भाषणात भारतीयांच्या अनेक गुणांचा उल्लेख केला. विशेषत: भारतीयांच्या काही गुणांचा अभिमान वाटत असल्याचं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. आपल्या भाषणाला ‘नमस्ते, नमस्ते, नमस्ते’, असं म्हणून सुरुवात करणाऱ्या ट्रम्प यांना उपस्थितांनी दिलखुलास दाद दिली!

‘मी आणि माझी पत्नी ८ हजार मैलांचा प्रवास करून हेच सांगायला आलोय की अमेरिकेचा भारतावर विश्वास आहे, भारतावर प्रेम आहे आणि भारतीयांवर कायम प्रेम राहील, असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी भाषणाला सुरुवात केली. ‘तुमच्या देशात आमचं केलेलं भव्य स्वागताबद्दल तुमचे आभार. तुमचा पाहुणचार मी आणि मलायना कायम लक्षात ठेऊ. या दिवसापासून भारताची आमच्या ह्रदयात विशेष जागा असेल’, असं देखील ट्रम्प यांनी यावेळी नमूद केलं.

- Advertisement -

‘कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर भारतीय त्यांना हवं असलेलं काहीही मिळवू शकतात, याचं तुम्ही एक उदाहरण आहात. तुमचा देश खूप चांगलं काम करत आहे. आम्हाला भारताचा अभिमान आहे. भारताची कथा ही लोकशाहीच्या एका चमत्काराची, प्रगतीची, वैविध्याची आणि चंगल्या लोकांची कथा आहे. भारत मानवजातीला आशा देतो. फक्त ७० वर्षांत भारत एक आर्थिक महासत्ता होऊ लागला आहे, सर्वात मोठी लोकशाही झाला आहे. जगातल्या सर्वात महान देशांपैकी एक देश भारत झाला आहे’, असं डोनाल्ड ट्रम्प यावेळी म्हणाले.

भारताची खरी ताकद या देशातल्या करोडो लोकांच्या धडधडत्या ह्रदयांमध्ये आहे. तुमच्या निश्चयामुळे हा देश घडला आहे. आज मी प्रत्येक भारतीयाला आवाहन करतो की तुमच्या भूतकाळातून प्रेरणा घ्या. उज्ज्वल भवितव्यासाठी एकत्र या. आपण दोन्ही देश मिळून मानवजातीसाठी शांतता आणि प्रगतीसाठी प्रयत्न करूयात.

डोनाल्ड ट्रम्प, राष्ट्राध्यक्ष, अमेरिका

भारताची क्षमता अतुलनीय आहे. एक संपन्न आणि स्वतंत्र देश म्हणून भारताची उभारी ही जगासाठी उदाहरण आहे. आणि तुम्ही एक शांततापूर्ण, स्वतंत्र आणि लोकशाही देश म्हणून हे मिळवलं आहे. गेल्या ७० वर्षांतल्या भारताच्या प्रगतीची कशाशीही तुलना होऊ शकत नाही. स्वतंत्र समाजव्यवस्थेमध्ये तुमचा विश्वास, तुमच्या नागरिकांमध्ये तुमचा विश्वास आणि प्रत्येक व्यक्तीला सन्मान या तुमच्या गुणांमुळेच अमेरिका आणि भारत नैसर्गित मित्र ठरतात’, असं ट्रम्प यावेळी म्हणाले.

- Advertisement -

‘हा देश बॉलिवूडमधून वर्षाला २००० चित्रपट बनवतो. जगभरातले लोकं त्यांचा आनंद घेतात. डीडीएलजेसारखे सिनेमे लोकं बघतात. सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्यासारखे खेळाडू या देशातून आले आहेत. दिवाळीत तुम्ही चांगल्याचा वाईटावर विजय साजरा करण्यासाठी दिवाळी साजरी करता. काही दिवसांतच तुम्ही होळीसारखा सुंदर सण साजरा करणार आहात. भारतात सर्व धर्मांचे लोकं एकत्र नांदतात, १०० प्रकारच्या भाषा इथे बोलल्या जातात त्याही अनेक राज्यांमधून. तरीदेखील तुम्ही सगळे एक महान देश म्हणून उभे आहात. तुमची एकता देशासाठी प्रेरणादायी आहे’, अशा शब्दांत ट्रम्प यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

‘३ बिलियन डॉलर किंमतीची अत्याधुनिक हेलिकॉप्टर आणि इतर लष्करी सामग्री देण्याचा करार भारत आणि अमेरिकेमध्ये होणार असल्याची देखील घोषणा यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. कट्टर दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी एकत्र प्रयत्न करण्याची देखील घोषणा ट्रम्प यांनी केली. आमच्या सीमा या दहशतवाद आणि दहशतवाद्यांसाठी नेहमीच बंद असतील. आमच्या नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्यांना मोठी किंमत द्यावी लागेल. प्रत्येक देशाला त्यांच्या सीमा सुरक्षित आणि नियंत्रित करण्याचा अधिकार आहे. यासाठी आम्ही पाकिस्तानसोबत दहशतवादी आणि पाकिस्तानी सीमेवरील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी काम करत आहोत. आम्हाला आशा आहे की दक्षिण आशियातील शांतता आणि प्रगतीमध्ये भारताची महत्त्वाची भूमिका असणार आहे. अमेरिका आणि भारत या देशांमध्ये द्वीपक्षीय आर्थिक आणि व्यापारविषयक करार करण्याचा देखील आम्ही विचार करत आहोत’, असं ट्रम्प म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -