‘राम मंदिराचे बांधकाम सुरु होताच कोरोनाचा अंत होणार’

rameshwar sharma mp speaker
मध्य प्रदेशचे विधानसभा अध्यक्ष रामेश्वर शर्मा

अयोध्येत ५ ऑगस्ट रोजी राम मंदिराचे भूमिपूजन होऊन बांधकामाला सुरुवात झाल्यानंतर कोरोना व्हायरसचा अंत सुरु होईल, असे विधान भाजपचे नेते आणि मध्य प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष रामेश्वर शर्मा यांनी केले आहे. जगभरातील आरोग्य यंत्रणा कोरोना व्हायरसला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शास्त्रज्ञ कोरोनावरील लसीवर संशोधन करत आहेत. तरिही कोरोना व्हायरसचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत जात आहे. मात्र राम मंदिरांचे काम सुरु झाल्यानंतर कोरोना व्हायरस संपायला सुरुवात होईल, असे वक्तव्य भाजपनेत्याने केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

भारतात काल सर्वाधिक ४५ हजार ७२० रुग्णांची नोंद झाली. तर एकूण रुग्णसंख्या ही १२ लाख ४१ हजारांच्या आसपास पोहोचली आहे. मृतांचा आकडा देखील ३० हजाराच्या जवळ पोहोचला आहे. एकीकडे रुग्णसंख्या वाढत जात असताना आरोग्य व्यवस्था अपुरी पडत आहे. मुंबई, पुणे, दिल्ली सारख्या शहरात अजूनही काही रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्यामुळे आपले प्राण गमवावे लागत आहेत. एकूणच कोरोनामुळे देशातील जनता भयभीत झालेली असताना भाजपचे नेते रामेश्वर शर्मा यांनी हे अजब विधान केले आहे.

रामेश्वर शर्मा म्हणाले की, “प्रभू रामचंद्रांनी राक्षसांचा विनाश करुन मानवजातीच्या कल्याणासाठी वेळोवेळी पुनर्जन्म घेतला आहे. तसेच यावेळी राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात होताच कोरोनाही संपायला सुरुवात होईल, असा विश्वास त्यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केला. कोरोनाचे संकट हे संपुर्ण जगावर कोसळलेले संकट आहे. आपण सराकरने दिलेले नियम पाळत आहोतच, त्याशिवाय देवाची भक्ती देखील जरूरी आहे.”