Fake Covid-19 Test Scam: कुंभमेळा बनावट कोरोना टेस्ट प्रकरणी उत्तराखंडतील दोन अधिकाऱ्यांचे निलंबन

Fake Covid-19 Test Scam two officers of uttarakhand suspended in case of corona fake test scam during kumbha mela
Fake Covid-19 Test Scam: कुंभमेळा बनावट कोरोना टेस्ट प्रकरणी उत्तराखंडातील दोन अधिकाऱ्यांचे निलंबन

उत्तराखंडतील हरिद्वार कुंभमेळ्यादरम्यान बनावट कोरोना टेस्ट केल्याप्रकरणी दोन अधिकाऱ्यांचे निलंबन केल्याची माहिती समोर आली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या आदेशानुसार, औषध आणि आरोग्य अधिकारी डॉ अर्जुन सिंह सेंगर आणि तत्कालीन प्रभारी (वैद्यकीय व आरोग्य) डॉ. एन.के. त्यागी यांचे गुरुवारी रात्री निलंबन करण्यात आले.

बनावट कोरोना चाचणी घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी हरिद्वारच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी एक समिती स्थापन केली होती. या समितीच्या शिफारशीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली आहे. यावर मुख्यमंत्री धामी यांनी सांगितले की, कोणत्याही स्तरावर भष्ट्राचार आणि निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. या बनावट कोरोना चाचणी प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल.

समितीला चौकशीदरम्यान आढळले की, या दोन्ही अधिकाऱ्यांनी हरिद्वार कुंभ मेळ्यादरम्यान बनावट रॅपिड अँटीजन चाचणी करणाऱ्या कंपन्यासह हात मिळवणी केली होती. याप्रकरणी समितीने निष्काळजीपणा आणि राज्याचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी दोन्ही आरोपी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस केली आहे.

हरिद्वारच्या मुख्य विकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने १६ ऑगस्ट रोजी सरकारसमोर अहवाल सादर केला. यावेळी हरिद्वारचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP) सेंथिल अवुदाई कृष्ण राज एस यांना बनावट कोरोना टेस्ट घोटाळ्यात सहभागी असलेल्या कंपन्यांवर योग्य कायदेशीर करण्यात सांगितले आहे.