घरताज्या घडामोडीशेतकरी आंदोलन तीव्र होणार, सरकारचा प्रस्ताव अमान्य, देशभरात १४ तारखेला घेराव!

शेतकरी आंदोलन तीव्र होणार, सरकारचा प्रस्ताव अमान्य, देशभरात १४ तारखेला घेराव!

Subscribe

राजधानी दिल्लीच्या सीमारेषांवर मोठ्या संख्येने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी अजूनही आंदोलनावर ठाम राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीमधून काहीही निष्पन्न झालेलं नसताना आज केंद्र सरकारकडून आंदोलकांना एक प्रस्ताव पाठवण्यात आला होता. मात्र, यामध्ये कोणतंही निश्चित नियोजन नसल्यामुळे हा प्रस्ताव आम्ही फेटाळून लावत आहोत, असं आंदोलक शेतकऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. आंदोलकांच्या शिष्टमंडळाने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी भूमिका जाहीर केली आहे. त्यासोबतच येत्या १४ डिसेंबर रोजी देशभरात धरणे आंदोलन केलं जाईल, असं देखील आंदोलकांनी जाहीर केलं आहे.

आंदोलन सुरूच राहणार!

केंद्र सरकारने दिलेल्या प्रस्तावाला फेटाळून लावतानाच आंदोलकांनी येत्या १२ आणि १४ डिसेंबर रोजी देशभरात आंदोलन करण्याची घोषणा केली. येत्या १२ डिसेंबरपर्यंत राजस्थानकडून दिल्लीकडे येणारे आणि आग्र्याकडून दिल्लीकडे येणारे रस्ते बंद करण्यात येतील. त्यानंतर १४ डिसेंबरला देशभरात विविध ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येतील. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयं, भाजपचे मंत्री, रिलायन्सचे मॉल, टोल प्लाझा यांना घेराव घालण्यात येतील. त्यासोबतच, १२ डिसेंबरला देशभरात कुणीही टोल भरणार नाही, असं देखील आंदोलकांनी यावेळी जाहीर केलं.

- Advertisement -

अदानी-अंबानींच्या उत्पादनांवर बहिष्कार

दरम्यान, यावेळी आंदोलकांनी अदानी-अंबानी या मोठ्या उद्योजकांच्या सर्व उत्पादनांवर बहिष्कार घालणार असल्याचं देखील जाहीर केलं आहे. यामध्ये रिलायन्सच्या जिओ सिम कार्डचा देखील समावेश आहे. जिओमधून मोबाईल नंबर पोर्टेबर करण्यासाठी येत्या काही दिवसांमध्ये मोठ्या संख्येनं अर्ज केले जातील, असं देखील आंदोलकांनी जाहीर केलं. त्यासोबतच, रिलायन्सचे मॉल, टोल प्लाझा अशा सर्व ठिकाणी बहिष्कार केला जाईल, असं देखील सांगण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -