घरदेश-विदेशपाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरींना अटक, निवडणूक आयोगाला धमकावल्याचा आरोप

पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरींना अटक, निवडणूक आयोगाला धमकावल्याचा आरोप

Subscribe

इस्लामाबाद : आर्थिक गर्तेत सापडलेल्या पाकिस्तानची आता राजकीय अस्थिरतेकडे वाटचाल सुरू झाली आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे निकटवर्ती माजी मंत्री फवाद चौधरी यांना पोलिसांनी अटक केली आहे. निवडणूक आयोगाला जाहीरपणे धमकी दिल्याचा तसेच पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे (PTI) प्रमुख इम्रान खान यांना अटक करण्याचे कारस्थान विद्यमान सरकार करत असल्याचा आरोपही फवाद चौधरी यांनी केला आहे. याचप्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे.

इम्रान खान यांच्या अटकेची शक्यता वर्तविण्यात येत असतानाच फवाद चौधरी यांना अटक करण्यात आल्याचे पीटीआयचे नेते फारुख हबीब यांनी बुधवारी सकाळी सांगितले. इस्लामाबाद पोलिसांनी चौधरींच्या अटकेची पुष्टी केली आहे. निवडणूक आयोगाचे सचिव उमर हमीद यांनी काल, मंगळवारी रात्री इस्लामाबादमधील कोहसार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. फवाद चौधरी यांनी निवडणूक आयोग आणि सदस्यांना धमकावणारी भाषा वापरल्याचे उमर हमीद यांनी म्हटले आहे. या तक्रारीच्या आधारे चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisement -

लाहोरमध्ये इम्रान खान यांच्या घराबाहेर जाहीर सभेला संबोधित करताना फवाद चौधरी यांनी निवडणूक आयोगाच्या सदस्यांच्या कुटुंबीयांनाही धमक्या दिल्याचा आरोप आहे. फवाद चौधरी यांना लाहोरमधील ठोकर नियाज बेग भागातील त्यांच्या घरातून अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना इस्लामाबादला आणण्यात आले. पीटीआयचे नेते फारुख हबीब यांनी फवाद चौधरीला पोलिसांच्या वाहनातून नेत असल्याचा व्हिडीओही शेअर केला आहे. तसेच, आयात केलेले सरकार वेडे झाले आहे, असे ट्वीटही त्यांनी केले आहे.

- Advertisement -

पीटीआयच्या नेत्यांनी फवाद चौधरी यांच्या अटकेवरून शाहबाज शरीफ सरकारवर निशाणा साधला आहे. मंत्री फवाद चौधरी यांच्या अटकेनंतर इम्रान खान यांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या संख्येने समर्थक जमा झाले आहेत. इम्रान खान यांना देखील लवकरच अटक होईल, अशी तिथे चर्चा आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -