लहान मुलांच्या हातात मोबाईल देताय तर सावधान! एका महिलेच्या अकाउंटवरून ३ लाख झाले गायब

Fraud of 3 lakh 22 thousand due to online gaming
लहान मुलांच्या हातात मोबाईल देताय तर सावधान! एका महिलेच्या अकाउंटवरून ३ लाख झाले गायब

सध्या कोरोनाचा काळ आहे, त्यामुळे आपली मुलं घराबाहेर पडून कोरोनाचा शिकार होऊन नये, असं प्रत्येक पालकांना वाटतं. त्यामुळे पालक अशावेळी आपल्या मुलांना घरातच रमवून ठेवण्यासाठी आपला मोबाईल देतात. मग काही मुलं मोबाईलवर व्हिडिओ बघतात तर काही मुलं ऑनलाईन गेम खेळतात. पण हेच ऑनलाईन गेम खेळणं पालकांना खूप महागात पडतं. कारण अशी काहीशी घटना एका महिलेसोबत घडली आहे. कोणताही ओटीपी, पिन, फोन कॉल शिवाय तिच्या बँक अकाऊंटवरून तब्बल ३ लाख गायब झाल्याचे समोर आलं आहे. छत्तीसगढमधील कांकेर येथे ही घटना घडली आहे.

कांकेर येथील ही महिला जेव्हा पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये गेली, तेव्हा तिला अकाऊंटमध्ये फक्त ९ रुपये शिल्लक असल्याचे कळाले. एकूण ३ लाख २२ हजार रुपये गायब झाले होते. महिलेला कोणताही कॉल, पिन, ओटीपी न येऊनही पैसे गायब झाले होते. त्यामुळे महिलेने थेट पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. मग याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आणि एका ऑनलाईन गेमच्या माध्यमातून ३ लाख रुपये गायब झाल्याचे समोर आले.

या गेममुळे झाले लाखो रुपये गायब

महिलेच्या १२ वर्षांच्या मुलाला फ्रि फायर गेम खेळण्याचे व्यसन होते. तो सतत हा गेम खेळत असतं. या गेमच्या आर्थिक व्यवहारासाठी त्याने आपल्या आईचे बँक अकाऊंट लिंक केले होते. गेम खेळण्यासाठी मुलगा हत्यारे खरेदी करत होता. याच माध्यमातून त्याने २८७ वेळा व्यवहार करत ३ लाख २२ हजार रुपये खर्च केले. त्यामुळे जर तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळत असतील तर त्या गेमला बँक अकाऊंट लिंक आहे की नाही ते एकदा व्यवस्थित तपासून पाहा.