गुलाम नबींच्या नव्या पक्षातून संस्थापक सदस्यच झाले ‘आझाद’, काँग्रेसमध्ये परतण्यास सुरुवात

नवी दिल्ली : माजी खासदार गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वाखालील डेमॉक्रॅटिक आझाद पार्टीला (DAP) आज आणखी एक जोराचा झटका बसला. पक्षाच्या दोन नेत्यांनी मंगळवारी इतर 58 राजकीय कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विधान परिषदेचे माजी सदस्य निजामुद्दीन खटाना, त्यांचा मुलगा गुलजार अहमद खटाना तसेच इतरांचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (AICC) जम्मू-काश्मीरच्या प्रभारी रजनी पाटील आणि जम्मू-काश्मीरचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष वकार रसूल वाणी यांनी स्वागत केले.

पक्षाच्या मुख्यालयात या प्रसंगी माजी उपमुख्यमंत्री तारा चंद, माजी मंत्री पीरजादा मोहम्मद सईद आणि माजी आमदार बलवान सिंग हेही उपस्थित होते. विशेष म्हणजे, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांच्या समर्थनार्थ तारा चंद यांच्यासह काही ज्येष्ठ नेत्यांनी प्रदेश काँग्रेसचा राजीनामा दिला आणि डेमॉक्रॅटिक आझाद पार्टीमध्ये सामील झाले होते. मात्र काही काळानंतर डीएपीच्या विरोधात काम केल्याच्या आरोपावरून या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आणि या महिन्याच्या सुरुवातीला ते काँग्रेसमध्ये परतले होते.

“काही जण नव्याने स्थापन झालेल्या पक्षाच्या प्रभावाखाली काँग्रेस सोडून गेले होते. या सर्व 60 कार्यकर्त्यांपैकी 70 ते 80 टक्के कार्यकर्ते आता काँग्रेसमध्ये परतले आहेत. हे सर्वजण नव्याने स्थापन झालेल्या पक्षाचे (DAP) संस्थापक सदस्य होते, असे प्रदेशाध्यक्ष वकार रसूल वाणी यांनी पत्रकारांना सांगितले.

डेमोक्रॅटिक आझाद पक्षाचे सरचिटणीस निजामुद्दीन खटाना तसेच गुजर व बकरवाल कल्याणकारी मंडळाचे माजी उपाध्यक्ष गुलजार अहमद खटाना यांनी 10 जानेवारीला 2023 रोजीच डीएपीचा राजीनामा दिला. काँग्रेसच्या जम्मू-काश्मीर प्रभारी रजनी पाटील यांनी पक्षात प्रवेश करणाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांना पक्षात योग्य सन्मान मिळेल, अशी ग्वाही दिली. हे लोक दोन महिन्यांच्या सुट्टीवर गेले होते आणि आता कामावर परतले आहेत, असे काँग्रेस नेतृत्वाचे मत आहे. आम्ही एकत्र पुढे जाऊ आणि आमचा पक्ष मजबूत करू, असे सांगत येत्या काही दिवसांत आणखी डीएपीचे नेते पक्षात सामील होतील, असा दावाही त्यांनी केला.