घरदेश-विदेशजी-20 परिषदेचा वापर 'इव्हेंट मॅनेजर'कडून निवडणुकीसाठी केला जाण्याची शक्यता, काँग्रेसची टीका

जी-20 परिषदेचा वापर ‘इव्हेंट मॅनेजर’कडून निवडणुकीसाठी केला जाण्याची शक्यता, काँग्रेसची टीका

Subscribe

नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या जी-20चे अध्यक्षपद भारताने स्वीकारले आहे. यावरून काँग्रेसने बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. जगातील सर्वात मोठे ‘इव्हेंट मॅनेजर्स’ पुढील वर्षी भारतात होणाऱ्या जी-20 शिखर परिषदेचा वापर खर्‍या प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी करतील तसेच 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्याच फायदा उठवण्याचा प्रयत्नही केला जाईल, अशी टीका काँग्रेसने केली आहे.

- Advertisement -

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विटरवरून पंतप्रधान मोदींवर टीका केली. 19 प्रमुख अर्थव्यवस्था आणि युरोपिय संघातील देशांचा समावेश असलेला जी-20 गटाची स्थापना 1999मध्ये झाली. 2008पासून, प्रत्येक सदस्य देशामध्ये वार्षिक शिखर परिषदेचे आयोजन केले जाते. प्रत्येक देशाला संधी मिळते. त्यानुसार भारताला सुद्धा 2023मध्ये या शिखर बैठकीचे यजमानपद भूषविण्याची संधी मिळाली आहे. आधीच्या शिखर बैठकींचे स्वागत ज्याप्रकारे झाले, तसेच स्वागत या परिषदेचेही होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

त्यानंतर त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान केले. नवी दिल्लीत 1983मध्ये अलिप्त राष्ट्रांची परिषद आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये 100हून अधिक देश सहभागी झाले होते. त्यानंतर कॉमनवेल्थ परिषद झाली. जगातील सर्वात मोठे इव्हेंट मॅनेजर 2023च्या शिखर परिषदेचा उपयोग खऱ्या मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी आणि पुढील लोकसभा निवडणुकीत त्याचा फायदा मिळवण्यासाठी करतील, अशी टीका त्यांनी केली.

- Advertisement -

अध्यक्षपद भारतीयांसाठी अभिमानाची बाब – मोदी
इंडोनेशियाने बुधवारी बाली शिखर परिषदेच्या समारोपाच्या अनुषंगाने पुढील एक वर्षासाठी जी-20चे अध्यक्षपद भारताकडे सुपूर्द केले. इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी जी-20चे अध्यक्षपद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वाधीन केले. आता भारत 1 डिसेंबरपासून हे अध्यक्षपद अधिकृतपणे स्वीकारेल. पुढील शिखर संमेलन 9 आणि 10 सप्टेंबर 2023ला नवी दिल्लीत होईल.

जी-20चे अध्यक्षपद स्वीकारणे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आम्ही आमच्या देशातील विविध शहरे आणि राज्यांमध्ये जी-20 परिषदेच्या बैठका आयोजित करू इच्छितो. आमच्या पाहुण्यांना भारतातील विविधता, सर्वसमावेशक परंपरा आणि सांस्कृतिक समृद्धीचा पूर्ण अनुभव मिळेल. ‘मदर ऑफ डेमोक्रसी’ असलेल्या भारतातील अनोख्या उत्सवात आपण सर्वांनी सहभागी व्हावे, अशी आमची इच्छा आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी म्हटले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -