चर्चचे फादर बनता बनता जॉर्ज फर्नांडिस कामगार नेते झाले…

जॉर्ज फर्नांडिस यांची सुरुवातीची ओळख एक विद्रोही म्हणून होती. राम मनोहर लोहिया हे जॉर्ज फर्नांडिस यांचे प्रेरणास्थान होते.

george-fernandes
माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस

माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे आज निधन झाले. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. झुंजार कामगार नेते असलेल्या जॉर्ज फर्नांडिस यांचा जन्म १९३० साली कर्नाटकात झाला होता. हिंदी, इंग्रजी, तमिळ, मराठी, कन्नड, उर्दु, मल्याळम, तुलू, कोंकणी आणि लॅटिन या १० भाषांवर जॉर्ज फर्नांडिस यांचे प्रभुत्व होते. मंगलौरमध्ये जन्म आणि शिक्षण झालेल्या जॉर्ज फर्नांडिस यांना १६ वर्षाचे असताना त्यांना एका क्रिश्चिन मिशनरीमध्ये पादरी बनण्याचे शिक्षण घेण्यासाठी पाठवण्यात आले. पण चर्चमधील वातावरणात ते रमले नाही. चर्चमधील ढोंगीपणामुळे ते निराश झाले आणि १८ व्या वर्षी ते चर्च सोडून रोजगाराच्या शोधात मुंबईत आले.

पादरीचे शिक्षण सोडून दिले

जॉर्ज फर्नांडिस यांनी स्वत: सांगितले होते की, ज्यावेळी ते मुंबईत आले होते त्यावेळी ते चौपाटीवर असलेल्या बँचवर झोपायचे. त्यावेळी ते सतत समाजवादी पार्टी आणि कामगार संघटनांच्या आंदोलनात ते सहभागी व्हायचे. फर्नांडिस यांची सुरुवातीची ओळख एक विद्रोही म्हणून होती. राम मनोहर लोहिया हे जॉर्ज फर्नांडिस यांचे प्रेरणास्थान होते.

मुंबईतील गरिबांचा हिरो

१९५० साली ते टॅक्सी चालक युनियनचे नेते बनले. विस्कटलेले केस, सडपातळ बांधा, फाटलेला खादीचा कुर्ता – पायजमा, झिजलेल्या चप्पल, चष्मा असा त्यांचा पेहराव असायचा. मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीय लोकं त्यावेळी त्यांना बंडखोर नेता म्हणायचे. मात्र मुंबईच्या रस्त्यावर राहणाऱ्या हजारो गरीबांसाठी ते एक हिरो आणि प्रेरणास्थान होते. त्यांच्या एका आवाजात मुंबई बंद व्हायची. याच काळात १९६७ मध्ये लोकसभा निवडणुक त्यांनी लढवली. त्यावेळचे काँग्रेसचे नेते एस. के. पाटील यांच्याविरोधात त्यांनी निवडणुक लढवली. एस. के. पाटील यांचा परभाव करुन त्यांनी निवडणुक जिंकली. तेव्हा लोकं त्यांना ‘जॉर्ज द जायंट किलर’ असे म्हणायचे.

लैला कबीर यांच्याशी लग्न

एकदा विमान प्रवासा दरम्यान, जॉर्ज फर्नांडिस यांची भेट लैला कबीर यांच्याशी झाली. लैला कबीर ह्या माजी केंद्रीय मंत्री हुमायूं कबीर यांची मुलगी होती. दोघांच्या अनेकदा भेटीगाठी झाल्या त्यानंतर त्यांनी लग्न केले. त्यांचा मुलगा शॉन फर्नांडिस हा न्यूयॉर्कमध्ये इन्व्हेस्टमेंट बँकर आहे. असे सांगितले जात की, जॉर्ज फर्नांडिस यांची जया जेटली यांच्याशी जवळीक वाढल्यानंतर लैला यांनी त्यांना सोडले. त्यानंतर जॉर्ज फर्नांडिस आजारी पडले. आजारी पडल्याचे कळताच २०१० साली लैला परत आल्या. जॉर्ज फर्नांडिस अल्जाइमर आणि पार्किंसन या आजाराने ग्रस्त होते.

जॉर्ज यांच्या संपत्तीचा वाद

लैला यांच्यासोबत राहायला लागल्यानंतर जॉर्ज फर्नांडिस यांच्या भावांनी देखील त्यांच्यावर हक्क असल्याचे दाखवले. हे प्रकरण अखेर कोर्टात गेले. त्यावर आलेल्या निकालामध्ये असे सांगण्यात आले होते की, जॉर्ज फर्नांडिस हे लैला आणि शॉन यांच्यासोबतच राहणार. त्यांचे भाऊ त्यांना भेटण्यासाठी येऊ शकतात. लैला फर्नांडिस यांनी विरोध केल्यानंतर काही वर्षांपूर्वी कोर्टाने जया जेटली यांना जॉर्ज यांना भेटण्यासाठी रोखले होते. या सर्व वादामागचे कारण जॉर्ज यांची संपत्ती असल्याचे देखील सांगितले जाते.

हेही वाचा – 

जॉर्ज फर्नांडिस यांच्याबद्दल या गोष्टी जाणून घ्या