घरदेश-विदेशगोव्यात राजकीय धुमश्चक्री, काँग्रेसचे २ आमदार भाजपमध्ये!

गोव्यात राजकीय धुमश्चक्री, काँग्रेसचे २ आमदार भाजपमध्ये!

Subscribe

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे गोव्यात सुरू झालेल्या राजकीय घडामोडी थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. आता गोवा काँग्रेसमधून २ आमदारांनी अमित शाह यांच्या भेटीनंतर भाजप प्रवेश केल्यामुळे या घडामोडी अधिकच वेगाने घडू लागल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आजारपणामुळे गोव्यातलं भाजपचं सरकार पडतंय की काय? अशा चर्चांना उधाण आलं होतं. मनोहर पर्रीकरांच्या खालावत चाललेल्या प्रकृतीकडे पाहून राज्यात विरोधात असलेल्या काँग्रेसने सत्ता स्थापनेचा दावा देखील केला होता. संख्याबळाचा विचार करता काँग्रेसचं संख्याबळ एकट्या भाजपपेक्षा जास्त असल्यामुळे भाजपची सत्ता जाऊन काँग्रेसचा मुख्यमंत्री गोव्यात सत्तारूढ होतोय की काय? असेच तर्क लढवले जात होते. मात्र, आता काँग्रेसचेच दोन आमदार भाजपमध्ये दाखल झाल्यामुळे काँग्रेसच्या दाव्यातली हवाच निघून गेली आहे. हे दोन आमदार अगदी नाट्यमय पद्धतीने भाजपमध्ये गेल्यामुळे काँग्रेसचं राज्यातलं संख्याबळही आपोआपच कमी झाल्यामुळे आता ते सत्तास्थापनेच्या स्पर्धेतूनही बाद झाल्यात जमा आहेत.

२ आमदारांचा भाजपमध्ये नाट्यमय प्रवेश!

१५ ऑक्टोबरला संध्याकाळपर्यंत गोवा काँग्रेसमध्ये सारंकाही आलबेल असल्याचंच चित्र होतं. गोवा काँग्रेसचे प्रमुख ए. चेल्लकुमार यांनाही त्यांच्या सर्व आमदारांवर पूर्ण विश्वास होता. मात्र, रात्री उशीरा अचानक गोव्यातले काँग्रेसचे आमदार दयानंद सातोपे आणि सुभाष शिरोडकर यांनी तातडीने फ्लाईट पकडून दिल्ली गाठली. दिल्लीमध्ये अमित शाह यांची भेट त्यांनी घेतली आणि भाजपमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. मध्यरात्री उशीरा दिल्लीमध्ये या सर्व घडामोडी घडत असताना गोव्यात काँग्रेसला मात्र याबद्दल माहिती नव्हती. अमित शहांची भेट झाल्यानंतर पत्रकारांनी जेव्हा शिरोडकरांना यासंदर्भात विचारणा केली, तेव्हा या भाजप प्रवेशाचा गौप्यस्फोट झाला आणि गोवा काँग्रेसमध्ये खळबळ माजली. सोमवारी मध्यरात्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास दोन्ही आमदारांनी औपचारिकपणे विधानसभा अध्यक्ष प्रमोद सावंत यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला.

- Advertisement -

वाचा सविस्तर – मनोहर पर्रिकरांना एम्समधून डिस्चार्ज; रेड अॅम्ब्युलन्समधून गोव्यात दाखल


गोवा काँग्रेसला अजून भगदाड पडणार?

दरम्यान, या दोन्ही आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ‘अजून काही आमदार भाजपमध्ये येतील’, अशी सोडलेली पुडी काँग्रेसच्या चिंतांमध्ये चांगलीच भर घालणारी ठरली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये काँग्रेसमधून अजून काही आमदार भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. सातोपे आणि शिरोडकर एकीकडे सोमवारी रात्री उशीरा दिल्लीची फ्लाईट पकडत असतानाच दुसरीकडे विश्वजीत राणेसुद्धा गोव्याच्या दाबोलिम विमानतळावर दिल्लीच्या फ्लाईटची वाट पाहात असताना दिसले. त्यामुळे भाजपमध्ये कोणती नवी नावं प्रवेश घेणार या चर्चेत राणेंचं नाव सर्वात वर आहे.

- Advertisement -

काँग्रेसची आकडेमोड बिघडली!

मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे गोव्यात राजकीय पक्षबदल होणार असल्याची चर्चा होती. त्यातच काँग्रेसने संख्याबळाच्या जोरावर गोवा राज्यपालांकडे सत्तास्थापनेसाठी आमंत्रित करण्याची विनंती केली होती. मात्र, आता दोन आमदार भाजपमध्ये गेल्यामुळे काँग्रेसचं संख्याबळ १६ आमदारांवरून १४ आमदारांवर आलं आहे. त्यामुळे येत्या काळात भाजपमधल्या राजकीय घडामोडी कोणती वळणं घेतात, यावर काँग्रेसचं भवितव्य अवलंबून असेल.


हेही वाचा – मनोहर पर्रीकरांना द्यायचाय मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -