गोटाबाय राजपक्षेंनी दिला श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदाचा राजीनामा

गोटाबाय राजपक्षेंनी श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा ई- मेलद्वारे श्रीलंकेतील संसदेच्या अध्यक्षांना पाठवला आहे.

shreelanka

गोटाबाय राजपक्षे यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदाचा राजीनामा ई- मेलद्वारे श्रीलंकेतील संसदेच्या अध्यक्षांना पाठवला आहे. गोटाबाय राजपक्षे यांनी बुधवारी देश सोडला आणि ते मालदीवला गेले. तेथे एक दिवसाचा मुक्काम केल्यानंतर ते सिंगापूरला पोहोचले आहेत.

गोटाबाय सिंगापूरच्या खासगी भेटीवर –

सिंगापूर सरकारने गोटाबाया राजपक्षे खासगी भेटीवर आल्याचे म्हटले आहे. सिंगापूर सरकारने म्हटले आहे की, गोटाबाया यांनी आमच्याकडे आश्रय मागितला नाही. आम्हीही त्यांना आश्रय दिला नाही.

 सशस्त्र दलाला बळ वापरण्याची परवानगी –

श्रीलंकेत मोठ्या संख्येने अजूनही लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी लष्कराला मैदानात उतरावे लागले आहे. श्रीलंकेच्या सरकराने एका निवेदनात म्हटले आहे की, श्रीलंकेच्या लष्कराने आंदोलकांना सर्व प्रकारच्या हिंसाचारापासून दूर राहण्याचे किंवा परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहण्याचे आवाहन केले आहे. सशस्त्र दलाच्या सदस्यांना मानवी जीवनास धोका, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्यास बळ वापरण्याची कायदेशीर परवानगी देण्यात आली आहे.

सुरक्षा दल आणि  जमावाची झटापट  –

बुधवारी श्रीलंकेत पंतप्रधान कार्यालय आणि संसदेच्या मुख्य रस्त्यावर आंदोलकांची सुरक्षा दलांशी झटापट झाली. या झटापटीत 84 लोक जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बॅरीगेटिंग अडथळे तोडून प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जमावावर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या आणि पाण्याचा मारा केला. दरम्यान, श्रीलंकेत शुक्रवारी होणारी संसदेची बैठक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. अध्यक्ष महिंदा यापा अभयवर्धने यांनी सांगितले की, राष्ट्रपतींचा राजीनामा प्राप्त झाल्यानंतर तीन दिवसांत संसद बोलावण्यात येईल. गोटाबाया राजपक्षे यांनी आज संध्याकाळी राजीनामा दिल्याने संसद बोलावण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे.