तिन्ही सैन्याला अलर्ट राहण्याचा इशारा

लडाखमधील गलवान खोऱ्यात भारतीय व चिनी सैन्यात झालेल्या हिंसक संघर्षानंतर तिन्ही सैन्याला अलर्ट राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. चीनी सैन्याला जशास तसे उत्तर देण्यासाठी हिंदी महासागरात भारतीय नौदलाने सैनिकांची कुमक वाढवली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षक दल प्रमुख जनरल बिपिन रावत आणि तिन्ही दलाच्या प्रमुखांची नुकतीच बैठक झाली. यात हा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, सोमवारी रात्री भारतीय व चिनी सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक झटापटीत २० जवान शहीद झाले आहेत. तर ४३ चीनी सैनिक मारले गेले आहेत. या घटनेनंतर भारतीय लष्कराने अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि लडाखमधील प्रमुख ठिकाणांवर जवानांची अतिरिक्त तुकडी रवाना केली आहे. हवाईदलानेही LAC आणि सीमेवर चीनी सैनिकांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी अतिरिक्त सैनिकांची तुकडी नियुक्त केली आहे. नौदलानेही हिंदी महासागरात गस्त वाढवली आहे. तर गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री भारतीय व चीनी सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक झटापटीनंतर दिल्लीत उच्चस्तरीय बैठकांना वेग आला आहे. आज राजनाथ सिंह यांनी जनरल बिपीन रावत यांच्यासह तिन्ही दलाच्या प्रमुखांबरोबर चर्चा केली. तर परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत झालेल्या घटनेवर सविस्तर चर्चा केली. तसेच दुसरीकडे गृह मंत्रालयातही उच्चस्तरीय अधिकाऱ्यांमध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.