घरताज्या घडामोडीनरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी आता नवीन तंत्रज्ञानाचा वापर

नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी आता नवीन तंत्रज्ञानाचा वापर

Subscribe

धोका कायम; मोहगावात पुन्हा बिबट्याच्या हल्ला, दोन युवक बचावले

नाशिकरोड । श्रीधर गायधनी

दोन महिन्यात चार बळी घेणा-या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी दोनवाडे, बाभळेश्वर व मोहगाव या तीन गावांत सात पिंजरे लावण्यात आले आहेत. सलग दोन दिवस बिबट्याने दोन बळी घेतल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. येथील बिबट्यांनी केलेल्या हल्ल्याचा अभ्यास करण्यासाठी व नाशिकच्या वनविभागाला मदत करण्यासाठी बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पथक नाशकात दाखल झाले आहे. दोनवाडे व बाभळेश्वर येथे तीन-तीन पिंजरे लावले आहेत, तर मोहगावात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लावलेल्या पिंज-याजवळ नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. यामुळे एक-दोन दिवसांत बिबट्या पकडण्यात यश येण्याची शक्यता वनविभागाच्या अधिका-यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, संध्याकाळी मोहगावातून दूचाकीवर जाणा-या युवाकांवर बिबट्याने हल्ला केला. मात्र, दुचाकीचा वेग असल्याने सुदैवाने युवक बचावल्याचे समजते. यामुळे धोका कायम असल्याचे दिसून येते.

बिबट्या डोंगरावर आणि पथक पायथ्याशी

बुधवारी संध्याकाळी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पथक बाभळेश्वर, मोहगाव परिसरात पाहणी करत असताना याचवेळी मोहगावच्या डोंगरावर बिबट्या दिसल्याचे नागरिकांनी सांगितले. बिबट्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर वनविभागाच्या अधिका-यांनी आपला मोर्चा मोहगावच्या दिशेने वळविल्याचे समजते. यामुळे या ठिकाणी नव्याने पिंजरा लावल्याची माहिती वनविभागाने दिली. मागील पंधरवाड्यात मोहगाव शिवारातील मक्याच्या शेतात लपून बसलेल्या बिबट्याला शोधून त्याला पिटाळले होते.

नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी कोंबडखताचा वापर

नाशिक वन विभागाच्या एका अधिका-याने माहिती देताना सांगितले की, बाभळेश्वर येथील नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या तीन पिंज-यांत बक-या ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, मोहगावच्या डोंगराच्या पायथ्याशी एक पिंजरा लावला असून याठिकाणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पशुवैद्यकिय अधिकारी डाॅ. शैलेश पेठे यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याला पिंज-यात जेरबंद करण्यासाठी पोल्ट्रीत तयार झालेल्या कोंबडखताचा वापर करण्यात आल्याचे अधिका-यांनी सांगितले. कोंबडखत पिंज-यापासून वेगवेगळ्या दिशांना आसपास टाकण्यात आले आहे, तसेच येथे लावण्यात आलेल्या पिंज-यात कोंबड्या ठेवण्यात आल्या आहेत. बिबट्याला कोंबड्यांचे जास्तच आकर्षण असल्याने या खताच्या वासाने तो पिंज-याकडे येऊन अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याठिकाणी हा प्रयोग यशस्वी झाला तर इतर ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारे प्रयोग करण्यात येतील, असे वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पथक बाभळेश्वर गावात

सतत दोन दिवसांत दोन बळी गेल्याने वनविभागासह शासन खडबडून जागे झाले आहे. आमदार सरोज आहिरे यांनी या नरभक्षक बिबट्यांना जेरबंद करण्या बरोबरच आवश्यकता पडल्यास गोळी मारुन ठार करण्याची मागणी वनमंत्र्यांकडे केली आहे. त्याचप्रमाणे बुधवारी दुपारी खा. हेमंत गोडसे यांनी पीडित कुटुंबाला भेट दिली. त्याचप्रमाणे येथे उपस्थित असलेल्या वनविभागाच्या अधिका-यांना सूचना केल्या. त्यानंतर बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. शैलेश पेठे यांच्यासह आलेल्या रेस्क्यू पथकाने नाशिक विभागाच्या अधिका-यांबरोबर बैठक घेत दारणा नदी काठच्या गावांतील बिबट्यांची संख्या, आज पर्यंत झालेले हल्ले, पकडलेले बिबटे, प्रत्यक्ष आढळून आलेले बिबटे या विषयी माहिती घेतल्याचे समजते. त्यानंतर पथकाने दोनवाडे येथील नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी लावेलल्या तीनही पिंज-यांची पाहणी केली. त्यानंतर संध्याकाळी बाभळेश्वर येथे हल्ला झालेल्या ठिकाणाची पहाणी केली. यावेळी ग्रामस्थांनी नरभक्षक बिबट्याला तत्काळ पकडण्याची मागणी केली.

बिबट्याचा दुचाकी चालकावर हल्ला, सुदैवाने बचावले

नवनाथ टिळे व हरी कटाळे हे त्यांच्या दुचाकीवरुन बुधवारी (दि.१७) संध्याकाळी साडेसात वाजता मोहगावातून बाहेर पडल्यानंतर थोड्या अंतरावरील उसाच्या शेतापासून जात असताना अचानक त्यांच्यावर बिबट्याने झडप मारली. परंतू दुचाकीचा वेग जास्त असल्याने या हल्ल्यातून सुदैवाने ते बचावले. दरम्यान, याचवेळी बिबट्याचे दोन बछडेही दिसल्याचे टिळे यांनी सांगितले.
Saiprasad Patil
Saiprasad Patilhttps://www.mymahanagar.com/author/sppatil/
गेल्या १३ वर्षांपासून नाशिकमध्ये पत्रकारितेचा अनुभव. सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, गुन्हेगारी यासह विविध विषयांवर लिखाण. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक स्तरावरील घडामोडींवर लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -