घरताज्या घडामोडीIndian Railway : रेल्वे स्थानकावर पानाच्या पिचकाऱ्या होणार गायब, रेल्वेची भन्नाट शक्कल

Indian Railway : रेल्वे स्थानकावर पानाच्या पिचकाऱ्या होणार गायब, रेल्वेची भन्नाट शक्कल

Subscribe

रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना अधिक सुविधा देण्याच्या दृष्टीने भारतीय रेल्वेकडून गेल्या काही वर्षांमध्ये अनेक मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत. त्यामध्ये आता स्वच्छतेच्या सुविधेचीही भर पडत आहे. रेल्वेकडून देण्यात येणाऱ्या सुविधेमध्ये आणखी एका स्वच्छतेशी संबंधित गोष्टीची भर पडणार आहे. अनेकदा प्रवाशांकडूनच रेल्वेत किंवा रेल्वे परिसरात पान, तंबाखु किंवा गुटखा खाऊन थुंकण्याचे प्रकार समोर येतात. हाच बेशिस्तपणा रोखण्यासाठी आता भारतीय रेल्वेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. सार्वजनिक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चाप घालण्यासाठी आता रेल्वे काही नवीन नियमावली आणत आहे. अनेकदा सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याच्या सवयीने अस्वच्छता निर्माण होतेच, पण त्यासोबतच अनेक आजारांचेही कारण ही सवय ठरते. कोरोना काळातही रेल्वेने अथक प्रयत्न करत अशा थुंकणाऱ्या लोकांविरोधात कारवाई केली, पण त्या मोहिमेला यश आले नाही. त्यामुळेच भारतीय रेल्वेने अशा अस्वच्छता निर्माण करणाऱ्या लोकांविरोधात एक शक्कल लढवली आहे.

रेल्वेला पान, तंबाखुच्या पिचकाऱ्या स्वच्छ करण्यासाठी दरवर्षी लाखो रूपये खर्च करावे लागतात. त्यासाठी पैशांसोबतच मोठ्या प्रमाणात मनुष्यबळही कामी लागते. त्यामुळेच रेल्वेने एक भन्नाट आयडिया शोधली आहे. त्यामुळेच कोरोनाच्या काळात संक्रमणासाठी कारणीभूत ठरणाऱ्या थुंकण्याच्या सवयीला ब्रेक लागतानाच दुसरीकडे स्वच्छतेसाठी खर्च होणाऱ्या पैशांचीही बचत होणार आहे. फक्त पानाचे आणि गुटख्याच्या पिचकारीला स्वच्छ करण्यासाठी रेल्वे दरवर्षी १२०० कोटी रूपये खर्च करते. आता रेल्वेने लढवलेल्या युक्तीमुळे सार्वजनिक हित जपतानाच आरोग्यही सुरक्षित राहील असा दावा रेल्वेचा आहे.

- Advertisement -

रेल्वे स्टेशनवर मिळणार खास सुविधा

रेल्वे पान, तंबाखु, गुटखा खाऊन पिचकारी मारणाऱ्या अन् थुंकणाऱ्या लोकांविरोधात एक भन्नाट आयडिया घेऊन आली आहे. अशा थुंकणाऱ्या लोकांना शिस्त लावण्यासाठी रेल्वेने देशातील एकुण ४२ स्थानकांवर वेडिंग मशीन किऑस्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. या किऑस्कमधून ५ रूपये आणि १० रूपयांचा पाऊच निघेल. त्यामुळे पाऊचच्या थुकदाणीचा वापर अशा लोकांना करता येणार आहे. त्यामुळे रेल्वे परिसर स्वच्छ राहण्यासाठीही मदत होईल.

सध्या रेल्वेने पश्चिम, उत्तर आणि मध्य रेल्वेच्या झोनसाठी या पाऊचच्या निर्मितीचे काम दिले आहे. नागपुरची एक स्टार्टअप कंपनी या पाऊचची निर्मिती करणार आहे. हा पाऊच तुम्ही खिशातही ठेवू शकता. तसेच गरज भासल्यास हा पाऊच लगेच वापरू शकता असे या पाऊचचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्गही आटोक्यात रहायला मदत होईल.

- Advertisement -

बायोडिग्रेडेबल पाऊच

हा पाऊच एक बायोडिग्रेडेबल पाऊच आहे. या पाऊचचा दिवसातून १५ ते २० वेळा वापर करणे शक्य आहे. या पाऊचचे वैशिष्ट्य म्हणजे तुमच्या थुंकीला हा पाऊच घन पदार्थात रूपांतरीत करतो. त्यामुळे कोणताही डाग लागण्याची शक्यता नसते. त्यासोबतच पर्यावरणासाठीही हा पाऊच उपयुक्त आहे. वापरानंतर पाऊच मातीत टाकल्यावरही तो बायोडिग्रेडेबल असल्याने नष्ट करता येतो. स्पूटम पाऊच (Sputum Pouch) च्या मशीन्स या नागपूरच्या स्टार्टअप कंपनीने विविध स्टेशनवर लावण्याची सुरूवातही केली आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -