Rakesh Tikait: शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर शाईफेक, पत्रकार परिषदेत जोरदार राडा, Video व्हायरल

शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांच्यावर काळी शाई फेकण्यात आली आहे. हा सर्व प्रकार कर्नाटकची (Karnataka) राजधानी बेंगळुरू येथील गांधी भवनात पत्रकार परिषद (Press Conference) घेत असताना घडला. शाई फेकणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच या प्रकारानंतर राकेश टिकैत यांच्या समर्थकांनी आरोपीला पकडून बेदम मारहाण केली. त्याचवेळी या घटनेनंतर कार्यक्रमात एकमेकांवर जोरदार खुर्च्या फेकण्यात आल्या. या सर्व प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

राकेश टिकैत यांच्या व्यतिरिक्त युद्धवीर सिंह यांच्यावरही आरोपींनी काळी शाई फेकली आहे. टिकैत पत्रकारांशी बोलत असताना ही घटना घडली. दरम्यान, काही तरुणांनी येथे येऊन त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला आहे. अचानक घडलेल्या या घटनेत राकेश टिकैत यांच्या चेहऱ्यावर, कपडे आणि पगडीवर शाई पडली आहे. यावेळी आरोपींनी खुर्च्याही तोडल्या आहेत.

ही शाई स्थानिक शेतकरी नेते के चंद्रशेखर यांच्या समर्थकांनी फेकल्याचे सांगितले जात आहे. पत्रकार परिषदेदरम्यान टिकैत यांना पत्रकारांनी शेतकरी नेते चंद्रशेखर यांच्याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे, असे विचारले असता उपस्थित लोकांनी सांगितले. मात्र, आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही,अशी प्रतिक्रिया राकेश टिकैत यांनी दिली आहे.

आम्हाला मोठ्या आंदोलनाची तयारी करायची असून शासनाच्या प्रत्येक चुकीच्या धोरणाला आम्ही विरोध करू. स्त्रीभ्रूण हत्या रोखणे, पर्यावरण या मुद्द्यांवरही महापंचायतीत चर्चा झाली, असं राकेश टीकैत म्हणाले.

कोण आहेत राकेश टीकैत?

राकेश टिकैत हे भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. त्यांचे मोठे भाऊ नरेश टिकैत हे बीकेयूचे अध्यक्ष आहेत. राकेश टिकैत यांनी सरकारविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. नुकतेच त्यांनी यूपीच्या योगी सरकारवर निशाणा साधताना म्हटलं आहे की, शेतकऱ्यांची ट्रॉली थांबवली तर पोलीस ठाण्यांमध्ये पेंढा भरला जाईल.

याशिवाय कूपनलिकांवर मीटर बसवण्याची तयारी सरकारने केली असल्याचेही त्यांनी सांगितले होते. बळजबरीने मीटर बसवल्यास शेतकऱ्यांच्या कूपनलिकांवर लावलेले मीटर पोलीस ठाण्यांमध्ये भरलेल्या अवस्थेत मिळतील, असं राकेश टीकैत म्हणाले होते.


हेही वाचा : PM Modi Security Lapse : हा शेतकऱ्यांचा रोष आहे का?, मोदींच्या सुरक्षेतील त्रुटीवर राकेश टिकैत यांचा सवाल