घरदेश-विदेशफक्त लढ म्हणा...

फक्त लढ म्हणा…

Subscribe

केरळमध्ये मुसळधार पावसानं काहीशी उसंत घेतल्यानंतर मदतकार्य जोरात सुरू आहे.

नजर जाईल तिकडे पुराचे पाणी….उन्मळून पडलेली झाडे….उद्धवस्त झालेले संसार….जीव मुठीत घेऊन सुरू असलेला जगण्याचा संघर्ष आणि मदतीसाठी भिरभिरती नजर. देवभूमी केरळमधील हे चित्र! वरूणराजाची अवकृपा झाली अन् धो – धो बरसायला सुरूवात झाली. हाहा म्हणता पाण्यानं धोक्याची पातळी ओलांडली आणि घरात शिरली. मनात धस् झालं. कष्ट करून उभा केलेला लाखमोलाचा संसार डोळ्यादेखत उद्धवस्त होत होता. राबराब राबून काबाड कष्ट करून ज्या झाडांना, पिकांना पोराप्रमाणे वाढवले त्यांना आज उन्मळून पडलेले पाहणे याशिवाय हातात काहीच नव्हते. धाय मोकलून रडण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. पण अश्रूदेखील दिसत नव्हते. संपलं सारं सार संपलं. निसर्गाच्या या प्रकोपातून उभं कसं राहायचं हाच यक्षप्रश्न होता. केरळमध्ये मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं क्षणात होत्याचं नव्हतं झालं. त्यानंतर संघर्ष सुरू झाला तो जगण्याचा. नव्यानं उभं राहण्याचा. मोडलेला संसार नव्यानं जमवण्याचा. देश-विदेशातून मदतीचे हात पुढे आले. मनानं उभारी घेतली आणि संघर्ष सुरू झाला तो नव्या उमेदीनं जगण्याचा आणि जगवण्याचा.

वाचा – केरळला महाराष्ट्राचा मदतीचा हात

- Advertisement -

आभाळच फाटलं….

मुसळधार पावसानं केरळमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. आभाळचं फाटलं त्याला ठिगळं तरी कुठं लावायचं? अशी अवस्था. वरूण राजाच्या आकांडतांडवानं आत्तापर्यत जवळपास ३५० पेक्षा देखील जास्त बळी घेतले आहेत. राज्यभरात सारखीच स्थिती. कुणीकुणाला सावरायचं हाच प्रश्न. ओसंडून वाहणारी धरणं. नद्यांना आलेला पूर. विस्कळीत झालेले जनजीवन आणि ठप्प झालेली वाहतूक. त्यामुळे मदत कार्यामध्ये येणारे अडथळे. त्यात आता वरूण राजानं काहीशी विश्रांती घेतल्यानं नागरिकांचा जीव देखील भांडयात पडला आहे. सध्या केरळमध्ये बचावकार्य जोमानं सुरू आहे. देश-विदेशातून मदतीचे हात पुढे आले आहेत. जगण्याच्या संघर्षाला आता साथ मिळाल्यानं केरळवासियांच्या चेहऱ्यावर देखील समाधान दिसू लागलं आहे. औषधे, अन्नधान्य, कपडालत्ता या साऱ्यासाठी लाखो मदतीचे हात सध्या केरळवासियांना सावरण्यासाठी आधार देत आहेत. सारं काही संपलं अशी असलेली मनस्थिती आता लढायचं आणि जगायचं या ठाम निर्धारापर्यंत येऊन पोहोचली आहे. केरळवासियांच्या या संघर्षला कुसुमाग्रजांच्या कणा कवितेतील दोन ओळी नक्की लागू पडतात.

ओळखलंत का सर मला? पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.

- Advertisement -

क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून
गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन.

माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.

भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते सारंच नेले
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.

कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे.

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
‘पैसे नकोत सर’, जरा एकटेपणा वाटला.

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्‍त लढ म्हणा!

वाचा – Kerala Flood : UAE ची केरळला ७०० कोटींची मदत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -