काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’वरून केरळ उच्च न्यायालयाने प्रशासन आणि पोलिसांना फटकारले

कोची : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत जोडो’ यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेत लोकांची खूप गर्दी होत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत आहे. नियम-कायद्यांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसते. यावरून केरळ उच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला आक्षेप घेतला आहे.

देशात पुन्हा एकदा नव्याने उभारी घेण्यासाठी काँग्रेसने ‘भारत जोडो यात्रा’ सुरू केली आहे. 7 सप्टेंबर रोजी तामिळनाडूच्या कन्याकुमारीपासून ‘भारत जोडो यात्रा’ सुरू झाली असून 12 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातून प्रवास करत जम्मू-काश्मीरमध्ये तिचा समारोप होईल. या यात्रेदरम्यान अनेक लोक त्यात सहभागी होत आहेत. त्याचे अनेक व्हिडीओ काँग्रेसकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात येत आहेत.

ही यात्रा केरळमधील ज्या रस्त्यावरून जात आहे, त्या राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठे झेंडे, पोस्टर आणि बॅनर लागल्याचे पाहायला मिळत आहे. यात्रेमुळे वाहतुकीलाही अडथळा येत आहे. तरीही राज्य सरकारने याबाबत कोणते पाऊल उचलले नाही. त्यामुळे हे प्रकरण आता केरळ उच्च न्यायालयात गेले आहे. न्यायमूर्ती देवन रामचंद्रन यांच्या एकलपीठासमोर ही सुनावणी सुरू असून न्यायालयाने राज्य सरकारचा खरपूस समाचार घेतला.

एक विशिष्ट पक्षाने केरळमधील रॅलीदरम्यान अनधिकृतपणे मोठ्या संख्येने बोर्ड, बॅनर, झेंडे आणि अन्य गोष्टी उभारल्या असल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली आहे. रस्ता सुरक्षिततेबाबत पोलीस आणि अन्य अधिकाऱ्यांनी डोळेझाक केली आहे. त्रिवेंद्र ते थिसूर तसेच त्याच्या पुढे राष्ट्रीय महामार्गावर एका विशिष्ट राजकीय पक्षातर्फे काही गोष्टी बेकायदेशीरपणे उभारल्या आहेत. पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांना याची माहिती आहे, पण त्यांनी याकडे दुर्लक्ष करण्याचे ठरविले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कचरा जमा झाला आहे, तो कुठे डम्प करणार, असा सवाल न्यायालयाने केला..

हायवेवर लावण्यात आलेले झेंडे आणि पोस्टर हे खूप त्रासदायक आणि दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकतात. महामार्गावर वेगाने वाहने धावत असतात. अशावेळी मोठमोठे झेंडे आणि पोस्टरमुळे चालकाचे लक्ष विचलित झाले तर, दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे. कदाचित जोरदार वाऱ्यामुळे एखादा पोस्टर उडून रस्त्यावर आला तर मोठी दुर्घटना घडू शकते. विशेषत: दुचाकींकरिता हे अतिशय धोकायदायक आहे, असे न्यायालयाने सुनावले.