बापरे! Audi, BMW, मर्सिडीजला एकाचवेळी टक्कर

एका महिला चालकाने पार्किंग लॉटमधून आपली गाडी बाहेर काढताना Audi, BMW आणि मर्सिडीज या ३ आलिशान गाड्यांना एकाचवेळी धडक दिली.

सीसीटीव्हीमध्ये कैद झाला संपूर्ण प्रकार

गाडी चालवताना तुमची छोटीशी चूकही महागात पडू शकते. गाडी चालवणाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे मोठा अपघातही घडू शकतो. ज्याप्रमाणे गाडी चालवण्यासाठी कसब लागतं त्याचप्रमाणे गाडी पार्क करण्यासाठीही चालवणाऱ्याने सतर्क असणं खूप गरजेचं असतं. गाडी पार्क करताना किंवा पार्किंगमधून बाहेर पडताना चूक झाल्यास, तिथल्या बाकीच्या गाड्यांचे नुकसान होण्याची संभावना असते. अशाच एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका महिला चालकाने पार्किंग लॉटमधून आपली गाडी बाहेर काढताना Audi, BMW आणि मर्सिडीज या ३ आलिशान गाड्यांना एकाचवेळी धडक दिली. संबंधित महिलेला तिची पार्क केलेली गाडी मागे घेता येत नव्हती. हा सगळा प्रकार पार्किंग लॉटच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला.

गाडी पार्किंगमधून बाहेर काढत असताना सर्वप्रथम तिने मर्सिडीजला धडक दिली, तरीही गाडी पार्किंगमधून बाहेर पडत नव्हती. त्यामुळे वैतागलेल्या त्या महिलेने पुन्हा एकदा गाडी मागे घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी तिची गाडी इतक्या जोरात रिव्हर्स आली की त्याची थेट धडक मागे पार्क असलेल्या BMW आणि Audi या दोन गाड्यांना बसली. या धडकेत दोन्ही महागड्या गाड्यांचं खूप नुकसान झालं. अखेर तिन्ही गाड्यांना धडक दिल्यानंतर या महिलेने कशीबशी तिची गाडी बाहेर काढली आणि पार्किंग लॉटमधून ठूम ठोकली.