घरदेश-विदेशLok Sabha 2024 : आजचे रावण हे शतमूर्ख आहेत, ठाकरे गटाचा कोणाला...

Lok Sabha 2024 : आजचे रावण हे शतमूर्ख आहेत, ठाकरे गटाचा कोणाला टोला?

Subscribe

आजच्या रावणांनी देशाची अस्मिता, स्वाभिमान, लोकशाहीरूपी सीतेचे अपहरण केले. अशा रावण संस्कृतीची हवा आपल्या देशात कशी निर्माण होईल? असा प्रश्न ठाकरे गटाने केला आहे.

मुंबई : रावणाचा अहंकार हेच त्याच्या पराभवाचे कारण ठरले. चौदा चौकड्यांचे त्याचे राज्य त्यामुळे रामाकडून खतम झाले. संपूर्ण देशातच आजचे वातावरण आणि हवा हुकूमशाही तसेच ढोंगाविरुद्ध आहे. रावण निदान विद्वान तरी होता. आजचे रावण हे शतमूर्ख आहेत, असे शरसंधान ठाकरे गटाने कोणाचे नाव न घेता केले आहे. (Lok Sabha election 2024 : on the occasion of Ram Navami, Thackeray group criticizes Modi along with BJP)

रामाच्या स्वागतासाठी फुले, रांगोळ्या आणि शेतकऱ्यांच्या वाटेवर खिळे ठोकणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधात जनता उभी ठाकली आहे. रामाचे मंदिर फक्त आपल्यामुळेच उभे राहिले अशी हवा निर्माण करण्याचा प्रयत्न मोदीभक्तांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच दंडकारण्यात गेले आणि वनवासी रामास बोट धरून अयोध्येत घेऊन आल्याची जाहिरातबाजी भरपूर करूनही मोदी यांची लाट सोडाच, पण हवाही निर्माण झाली नाही, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने रामनवमीचा संदर्भ देत सामना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : हवा ही अशीच बनत असते, ठाकरे गटाचा मोदी यांच्यावर निशाणा

रामाने रावणाचा पराभव केला. राम-रावण युद्ध सत्य आणि धर्मरक्षणासाठी झाले. राम हे एकवचनी होते. दिलेला शब्द पाळणारे मर्यादापुरुषोत्तम होते. रावणाने सीतेचे अपहरण केले म्हणजे हिंदू अस्मितेचेच अपहरण केले. आजच्या रावणांनी देशाची अस्मिता, स्वाभिमान, लोकशाहीरूपी सीतेचे अपहरण केले. अशा रावण संस्कृतीची हवा आपल्या देशात कशी निर्माण होईल? असा प्रश्न या अग्रलेखात विचारण्यात आला आहे.

- Advertisement -

मोदी यांची हवा 2014-2019 सालीही नव्हती. जसा कृत्रिम पाऊस पाडला जातो तसे ‘हवा हवा’ असे वातावरण निर्माण केले जाते. लोकांना भ्रमात ठेवून, मूर्ख बनवून निवडणुका लढवणे हे ‘हवा’ असल्याचे लक्षण नाही. मोदी यांचा विजय हा असत्य आणि अधर्माच्या हवेवर मिळविलेला असतो, असा घणाघात ठाकरे गटाने केला आहे.

प्रभू श्रीरामाने त्यांच्या जीवनचरित्रात एक महत्त्वाचा संदेश दिला आहे तो भाजपावाले विसरले. तो संदेश म्हणजे, असत्यावर उभारलेला डोलारा कोसळल्याशिवाय राहत नाही आणि सत्य कितीही खोलवर पुरले तरी प्रकट झाल्याशिवाय राहत नाही. मात्र त्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्याग करावा लागतो. राम वनवासात गेला नसता तर रामायण घडले नसते. बजरंगाने लंकाच जाळली ती रावणाची आणि आज जनतारूपी बजरंग हुकूमशाहीची लंका जाळायला सज्ज झाला आहे, असा विश्वास ठाकरे गटाने व्यक्त केला आहे.


Edited by – Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -