घरताज्या घडामोडीगुजरातच्या मोरबी पूल दुर्घटनेत 60 जणांचा मृत्यू; पंतप्रधानांकडून आर्थिक मदतीची घोषणा

गुजरातच्या मोरबी पूल दुर्घटनेत 60 जणांचा मृत्यू; पंतप्रधानांकडून आर्थिक मदतीची घोषणा

Subscribe

गुजरातमध्ये एक भयानक दुर्घटना घडली आहे. गुजरातच्या मोरबीमध्ये मच्छू नदीवरील पूल कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पूल कोसळल्याने 100हून अधिक जण पाण्यात कोसळल्याची भिती वर्तवली जात आहे. या दुर्घटनेनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकसानभरपाईची घोषणा केली आहे.

गुजरातमध्ये एक भयानक दुर्घटना घडली आहे. गुजरातच्या मोरबीमध्ये मच्छू नदीवरील पूल कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पूल कोसळल्याने 100हून अधिक जण पाण्यात कोसळल्याची भिती वर्तवली जात आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 60 जणांचा मृत्यु झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या दुर्घटनेनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकसानभरपाईची घोषणा केली आहे. त्यानुसार, मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचल्याची माहिती दिली आहे. (Morbi Accident Pm Narendra Modi Announced An Ex Gratia Of Rs 2 Lakhs Next Kin Who Lost Their Lives)

“मोरबी येथील अपघातामुळे खूप दु:ख झाले आहे. माझे या दुर्घटनेबाबत गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी आणि इतर अधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे. स्थानिक प्रशासन मदतकार्य करत आहे. एनडीआरएफही लवकरच घटनास्थळी पोहोचेल. जखमींवर तातडीने उपचार करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत”, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, गुजराच्या मोरबी येथील मच्छू नदीत केबल पूल तुटला. अपघात झाला तेव्हा पुलावर सुमारे 400हून अधिक जण होते. पूल कोसळताच लोक नदीत पडले. या घटनेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पंतप्रधान मोदींनी या घटनेबाबत अधिकाऱ्यांना तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल म्हणाले की, या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या नागरिकांप्रती मी शोक व्यक्त करतो. राज्य सरकार मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये आणि जखमींना पन्नास हजार रुपये देणार आहे. मुख्यमंत्री म्हणाले, पंतप्रधानांनी माझ्याशी मोरबी दुर्घटनेबद्दल बोलून परिस्थितीचा आढावा घेतला. बचाव कार्यावर सतत लक्ष ठेवण्याबाबत पंतप्रधानांनी आवश्यक सूचना आणि मार्गदर्शन केले आहे.

- Advertisement -

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. “मोरबीमधील दुर्घटनेने मी काळजीत आहे. माझे विचार आणि प्रार्थना प्रभावित झालेल्यांसोबत आहेत. मदत आणि बचाव कार्यामुळे पीडितांना दिलासा मिळेल”, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले.

“मोरबी येथे झुलता पूल कोसळण्याच्या दुर्घटनेने गुजरातला खूप दुःख झाले आहे. मी गुजरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो की त्यांनी बचाव कार्यात सर्वतोपरी मदत करावी आणि जखमींना मदत करावी. माझ्या संवेदना आणि प्रार्थना शोकग्रस्त कुटुंबांसोबत आहेत”, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केले. “गुजरातमधील मोरबी येथील पूल दुर्घटनेची बातमी अत्यंत दुःखद आहे. अशा कठीण प्रसंगी मी सर्व शोकग्रस्त कुटुंबांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो. मी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, अपघातातील जखमींना सर्वतोपरी मदत करावी आणि बेपत्ता लोकांच्या शोधात मदत करावी”, असे ट्विट करत राहुल गांधी यांनी म्हटले.

गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी सांगितले की, अपघातातील अधिकृत मृतांची संख्या 7 आहे. दरम्यान, मोरबीमध्ये केबल पूल कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर सरकारकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. जखमींवर उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, या अपघातात 60हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याच्या पंचायतमंत्र्यांनी दिली आहे.

या घटनेनंतर मोरबी शहरातील दुर्घटनेनंतर बचाव कार्यात मदत करण्यासाठी एनडीआरएफच्या तीन पथके (दोन गांधीनगर आणि एक बडोद्याहून) आधीच रवाना झाल्याची माहिती एनडीआरएफचे डीजी अतुल करवाल यांनी दिली.


हेही वाचा – गुजरातमध्ये मच्छू नदीवरील पूल कोसळला; 100 हून अधिक नागरिक पाण्यात कोसळले

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -